महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची शक्यता
बेळगाव : महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शनिवार दि. 7 रोजी होणार आहे. त्यामुळे सभागृहामध्ये त्या सभेची तयारी शुक्रवारी सुरू होती. सभागृह स्वच्छ करणे याचबरोबर नगरसेवकांचे नामफलक ठेवण्याचे काम कर्मचारी करत होते. शनिवारी होणारी ही सभा वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शुक्रवारी नगरविकास खात्याचे सचिव अजय नागभूषण आले असून त्यांनी सुवर्णसौध येथे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामुळे सर्व अधिकारी सुवर्णसौधकडेच उपस्थित होते. सध्या महानगरपालिकेमध्ये सफाई कंत्राटदार आणि आरोग्य स्थायी समितीच्या सदस्यांमध्ये जोरदार वाद सुरू आहे. 138 बेकायदेशीर सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याचा आरोप यापूर्वीही झाला आहे. त्या कर्मचाऱ्यांचे वेतन सफाई कंत्राटदाराने द्यावे म्हणून त्यांच्यावर दबाव घेतला जात आहे. त्या विरोधात सफाई कंत्राटदाराने महापालिका आयुक्तांकडे तक्रार दिली आहे. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला असून शनिवारच्या बैठकीमध्ये यावर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्तांच्या परवानगीशिवाय 138 कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे, असा आरोप होत आहे. या कामगारांची नियुक्ती करताना त्यांच्याकडून मोठी रक्कमही उकळण्याचा आरोप होत आहे. विरोधी गटाच्या नगरसेवकांनी मागील बैठकीतच या विषयावर चर्चा करण्याची मागणी केली होती. मात्र पुढील बैठकीत चर्चा केली जाईल, असे आश्वासन दिले गेले होते. त्यामुळे आता या विषयावर चर्चा होणार आहे.
काही अधिकारीही सामील
सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांनीही या प्रकरणाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. विरोधी गटाला छुपा पाठिंबाही दिला आहे. त्यामुळे शनिवारी या प्रकरणाला कोणते वळण लागणार हे पहावे लागणार आहे. एकूणच या प्रकरणामध्ये काही अधिकारीही सामील असून त्यांचेही पितळ उघडे पडणार का? हे पहावे लागणार आहे









