नेमणूक बेकायदेशीरच : विरोधी गटातील नगरसेवकांनी उठविला जोरदार आवाज, अधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती देण्यावर भर
प्रतिनिधी/ बेळगाव
महानगरपालिकेमध्ये 138 सफाई कामगारांची बेकायदेशीर नेमणूक करण्याबाबत तक्रारी वाढल्या होत्या. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र महापालिकेतील विरोधी गटाच्या नगरसेवकांनी शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये या कामगारांच्या नियुक्तीबाबतचा खुलासा करावा, अशी जोरदार मागणी केली. यामुळे या विषयावर अखेर चर्चा करावी लागली. 138 सफाई कामगार बेकायदेशीररित्या नेमणूक केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमून कामगार नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. त्यावर महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी समिती नेमून निश्चितच त्याची चौकशी करु व योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
शनिवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. महापौर शोभा सोमणाचे यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी वेळ दिला. त्यावेळी बेकायदेशीरित्या नियुक्त केलेल्या 138 कामगारांच्या खुलाशाची मागणी नगरसेवक रवी साळुंखे यांनी केली. याचबरोबर विरोधी गटातील अजिम पटवेगार यांनीही हा मुद्दा उचलून धरला. त्यामुळे या प्रश्नावर सभागृहामध्ये चर्चा करावी लागली. यावेळी सहाय्यक अभियंता हणमंत कलादगी हे सभागृहामध्ये चुकीची माहिती देत होते. मागील आयुक्तांनी नियुक्तीसाठी आदेश दिला आहे, असे सांगितले. मात्र त्यामध्ये कोणताच आदेश नसल्याचे दिसून आले. केवळ 25 टक्के कामगारांची नेमणूक करावी, असे त्या आदेशामध्ये म्हटले होते.
सफाई कामगारांची नियुक्ती करण्याचा अधिकार हा जिल्हाधिकारी तसेच आयुक्तांच्या आदेशानुसार होतो. कामगारांची नेमणूक त्या दोन्ही अधिकाऱ्यांनीच केली पाहिजेत. मात्र या कामगारांची नेमणूक कोणी केली? हे गुपीत ठेवण्याचा प्रयत्न सभागृहात दिसून आला. एकूणच या प्रकारामध्ये गैरप्रकार झाल्याचे दिसून आल्याने सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांची कोंडी झाली होती. गेल्या तीन महिन्याचे वेतन या कामगारांना देण्यात आले नाही. त्यांच्याकडून काम करुन घेण्यात आले आहे. मात्र वेतन दिले नाही तर हे चुकीचे असून त्याबाबत निर्णय घ्यावा आणि त्यांना वेतन देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आमगार राजू सेठ यांनी सभागृहात सांगितले.
महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सभागृहामध्ये माहिती देताना कशा प्रकारे कामगारांची नेमणूक केली जाते, हे सांगितले. ही प्रक्रिया चुकीची असल्याचे त्यांच्या माहितीवरुन दिसून आले. मागील आयुक्तांनी केवळ सफाई कंत्राटादारांच्या कामाची आणखी मुदत वाढवून दिल्याबाबतची माहिती देखील त्यांनी दिली. एकूणच या सफाई कामगार नियुक्तीबाबत कोणताच उल्लेख नसल्याचे दिसून आले. एकूणच हे प्रकरण चांगलेच सत्ताधारी पक्षाला भोवले.
कामगारांची नियुक्ती करताना त्यामध्ये मोठा गैरप्रकार झाला असून सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी रवी साळुंखे यांनी केली. त्यामुळे सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी जोरदार आक्षेप नोंदविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आमदार राजू सेठ यांनी नियुक्ती झाली आहे हे खरे आहे. ती चुकीची आहे हे देखील साऱ्यांनाच मान्य करावे लागेल. मात्र त्यांच्या वेतनाचा प्रश्न सध्या आहे तो सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी केले. एकूणच शनिवारच्या सभेमध्ये 138 कामगार नियुक्तीच्या मुद्द्यावरुन गोंधळ उडाला होता. यावेळी सत्ताधारी गटनेते राजशेखर डोणी, नगरसेवक अॅड. हणमंत कोंगाली यांच्यासह इतर नगरसेवकांनी आपले म्हणणे मांडले.









