विशेष चौकशी समिती नियुक्त : विमान वाहतूक मंत्र्यांची माहिती : आतापर्यंत 279 मृतदेह हाती
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
देशाला हादरवून टाकणाऱ्या अहमदाबादमधील एअर इंडिया ड्रीमलायनर विमान अपघातातील मृतांची संख्या 279 वर पोहोचल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. तसेच या दुर्घटनेबाबत शनिवारी विमान वाहतूक मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत तपासासंबंधी माहिती दिली. विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून त्याची चौकशी सुरू आहे. नेमके काय घडले हे जाणून घेण्यासाठी आम्हीही वाट पाहत आहोत, असे विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितले. केंद्रीय गृह सचिवांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून त्याचे काम सुरू झाले आहे. या समितीचा अहवाल तीन महिन्यात प्राप्त होईल, असेही विमान वाहतूक मंत्र्यांनी स्पष्ट केले.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये प्रवाशांव्यतिरिक्त वैद्यकीय वसतिगृहातील डॉक्टर्स, विद्यार्थी आणि स्थानिक लोकांचाही समावेश आहे. अजूनही घटनास्थळी ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. अनेक यंत्रणा ढिगारा हटवण्यात गुंतले आहेत. शनिवारी बचाव कर्मचाऱ्यांनी विमानाच्या ढिगाऱ्यातून आणखी एक मृतदेह बाहेर काढला. गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांनी लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान निवासी भागात कोसळले. या अपघातात विमानात 242 लोक होते. या अपघातातून फक्त एकच व्यक्ती बचावली. अपघाताला 30 तासांहून अधिक काळ लोटला आहे, परंतु आतापर्यंत फक्त सहा मृतांचे मृतदेह ओळख पटल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले आहेत.
बीजे मेडिकल कॉलेजच्या ज्युनियर डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष धवल गमेती यांनी पत्रकारांना सांगितले की, लोक अजूनही आपल्या नातेवाईकांचे मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयाबाहेर वाट पाहत आहेत. एअर इंडिया विमान दुर्घटनेतील मृतदेहांची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेत तांत्रिक विलंब आणि जळालेल्या मृतदेहांची स्थिती यामुळे ही प्रतीक्षा लांबत आहे. मृतांच्या नातेवाईकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असली तरी अनेक लोक दु:खसागरात बुडाल्यामुळे रुग्णालय परिसरात शोकाकूल वातावरण दिसून येत आहे.
तीन दिवसांनंतरही डीएनए तपासणी सुरूच
विमान अपघाताला तीन दिवस उलटून गेले आहेत, परंतु डीएनए प्रोफाइलिंग आणि दंत चाचण्यांची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे बहुतेक नातेवाईकांना त्यांच्या आप्तांचे मृतदेह मिळू शकलेले नाहीत. 135 मृतदेहांच्या दातांचे रेकॉर्ड गोळा करण्यात आले आहेत आणि त्यांची जुळणी प्रक्रिया सुरू असल्याचे फॉरेन्सिक दंत तज्ञ डॉ. जयशंकर पिल्लई यांनी स्पष्ट केले आहे. वेगवेगळ्या कक्षांमध्ये डीएनए तपासणी प्रक्रिया केली जात आहे.
वेदना, राग अन् असहाय्यता
‘आम्ही आमच्या कुटुंबातील चार सदस्य गमावले आहेत… पण आम्हाला अद्याप त्यांचे मृतदेह देण्यात आलेले नाहीत’ अशी उद्विग्न भावना रफिक अब्दुल हाफिज मेमन यांनी व्यक्त केली आहे. तसेच हर्षद पटेल या मुलाच्या वडिलांनीही प्रशासनावर राग व्यक्त केला आहे. ‘डीएनएसाठी 72 तास लागतील… पण ही वाट आता असह्य होत चालली आहे,’ असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
तपासाची दिशा आणि ज्वलंत प्रश्न
अहवालानुसार, सुरुवातीच्या तपासात इंजिनचा जोर कमी होणे, फ्लॅप्स निकामी होणे आणि लँडिंग गियर उघडे राहणे यासारख्या तांत्रिक कारणांवर संशय व्यक्त केला जात आहे. विमानाच्या उड्डाणानंतर लगेचच आपत्कालीन प्रतिसादात विलंब होणे हेसुद्धा अपघातामागील निमित्त ठरू शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. तसेच एअर इंडियाने आवश्यक देखभाल आणि सुरक्षा चाचणीचे पूर्णपणे पालन केले का? हा प्रश्न आता टाटा समूह आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या जबाबदारीवर मोठा दबाव आणत आहे.

व्यवस्थेतील त्रुटी आणि मानवी शोकांतिका
या अपघाताने भारतीय नागरी विमान वाहतूक सुरक्षा मानके उघडकीस आणली आहेत. एवढी मोठी आपत्ती असूनही मृतदेह ओळखण्याची आणि कुटुंबांना माहिती देण्याची व्यवस्था खूपच कमकुवत आणि असंघटित असल्याचे दिसून येते. आपत्ती व्यवस्थापनातील अपयश आणि फॉरेन्सिक सपोर्ट सिस्टमच्या मर्यादा आता समोर आल्या आहेत. भारताने अपघातग्रस्तांच्या कुटुंबांसाठी राष्ट्रीय मानक प्रोटोकॉल स्वीकारू नये का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विमान वाहतूक मंत्रालयाकडून प्रथमच सविस्तर माहिती
अहमदाबाद विमान अपघाताच्या घटनेतील महत्त्वाची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने शेअर केली आहे. शनिवारी माहिती देताना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव समीर कुमार सिन्हा म्हणाले की, एअर इंडियाच्या विमानाने दुपारी 1:39 वाजता उ•ाण केले. सुमारे 650 फूट उंचीवर पोहोचल्यानंतर विमानात बिघाड झाला. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनीही या अपघातावर पत्रकार परिषद घेतली. आपल्या देशात सुरक्षा मानके खूप कडक आहेत. जेव्हा ही घटना घडली तेव्हा आम्हाला वाटले की बोईंग 787 मालिकेतही सविस्तर देखरेखीची आवश्यकता आहे. डीजीसीएने 787 विमानांचे सविस्तर देखरेखीचे आदेशही दिले आहेत. आज आपल्या भारतीय विमान ताफ्यात 34 विमाने आहेत. यापैकी 8 विमानांची आधीच चौकशी झाली असून सर्व विमानांची त्वरित चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
एएआयबी चौकशीनंतर अहवाल येणार
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू म्हणाले की, विमान अपघात तपास ब्युरो तात्काळ सक्रिय करण्यात आला असून तो विमानांसंबंधी घडणाऱ्या घटना व अपघातांची चौकशी करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. ब्लॅक बॉक्सचे डीकोडिंग अपघात प्रक्रियेदरम्यान किंवा अपघातापूर्वीच्या क्षणांमध्ये खरोखर काय घडले याबद्दल सखोल माहिती देईल, असा विश्वास ‘एएआयबी’ टीमला आहे. आता ‘एएआयबी’च्या पूर्ण तपासणीनंतर कशापद्धतीचा अहवाल येतो याची सर्वांनाच प्रतीक्षा असल्याचे नायडू यांनी स्पष्ट केले.









