शिताफीने तपास करुन मुलाची सुटका; दुचाकीवरुन फिरवण्याच्या बहाण्याने चिमुरड्याचे अपहरण
आशिष आडिवरेकर कोल्हापूर
सात वर्षापूर्वी पतीने घराबाहेर काढले, यानंतर सासरसह माहेरचेही दरवाजे बंद झाले. तेव्हापासून चिमुकल्यासह घराबाहेर पडलेल्या सुषमा नाईकनवरे यांचा जगण्यासाठी संघर्ष सुरु झाला. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी मंदिरामध्ये भिक्षा मागण्यास सुरुवात केली. साताऱ्यातून पायपीट करत वाटेतील गावांमधील मंदिरांमध्ये थांबत थांबत नाईकनवरे या गुरुवारी (2 मार्च) रात्री आदमापूर येथील बाळूमामा मंदिरात दाखल झाल्या. येथे नाईकनवरे यांच्या असहाय्यतेचा फायदा घेत त्यांचा विश्वास जिंकत शितोळे दाम्पत्य नाईकनवरे यांच्या मुलाचे अपहरण करण्यात यशस्वी झाले. मात्र पोलिसांनी अत्यंत शिताफीने व नियोजनबद्ध तपास करुन 48 तासामध्ये चिमुरड्याला त्याच्या आईच्या ताब्यात दिले. केवळ कर्तव्य म्हणून या प्रकरणाचा तपास न करता खाकीतील माणूसकीचे दर्शन घडवून दिले.
दुचाकीवरुन फिरवण्याच्या बहाण्याने अपहरण
आदमापूर येथून अपहरण झालेल्या मुलाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. कायमच पायी प्रवास करणाऱ्या मुलास दुचाकीचे आकर्षण होते. हीच बाब हेरुन मोहन व छाया शितोळे यांनी सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण केले. दुचाकीवरुन तुला फिरवून आणतो असे सांगून त्याला दुचाकीवर पुढे बसविले. यानंतर त्याला निपाणी, चिक्कोडी, अंकली, चिंचणी मायक्का येथून मिरज मार्गे सांगोल्याला नेल्याची माहिती तपासात समोर आली.
खाकीच्या कर्तव्यासोबतच माणुसकी
पोलीस दलाने या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने व शिताफीने तपास केला. यामध्ये प्रत्येक पावलावर मुलाची सुरक्षितताच डोळ्यासमोर ठेवून शांत डोक्याने तपास करुन मुलाची सुखरुप सुटका केली. तपास पथकामध्ये दोन महिला कॉन्स्टेबलना जाणीवपुर्वक सामावून घेण्यात आले. मुलाची सुटका झाल्यानंतर महिला कॉन्स्टेबल त्याची व्यवस्थित काळजी घेतील याची खबरदारी घेण्यात आली होती. मुलग्याची सुटका केल्यानंतर त्याला परतीच्या प्रवासात दुसऱ्या मोटारीत बसविण्यात आले. मोटारीत बसल्यानंतर तो चिमुरडा काही काळ आनंदाने हरपून गेला.
आई कधी येणार…
आईची मानसिक उद्वीग्नता… उदरनिर्वाहासाठी गावोगावी फिरुन गावातील मंदिरात राहणे… भिक्षूकी करुन पोटाची भूक भागवणे अशी हालाखीची परिस्थिती. सहा वर्षाच्या चिमुरड्याला मात्र दुचाकी वरुन फिरण्याचे आकर्षण होते. संशयित मोहन व छाया यांनी हीच बाब हेरुन चिमुरड्याचे अपहरण केले. दुचाकीवरुन तब्बल 120 किलोमीटरचा प्रवास करुन तिघांना जवळा येथून ताब्यात घेतले. इतक्या प्रवासात चिमुरडा केवळ आई कधी भेटणार असेच या दोघांना विचारत होता. यावेळी छाया त्या चिमुरड्यास आई पाठीमागून येणार आहे. असे सांगून वेळ मारुन नेत होते.
नॉनस्टॉप 48 तास तपास
कोल्हापूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत शिताफीने केला. गुंतागुंतीचा असणारा तपास सलग 48 तास करुन चिमुरड्यास सुखरुप आईच्या ताब्यात दिले. पोलीस दलातील 7 पथके अविरत 48 तास या प्रकरणाचा तपास करत होते. वरिष्ठ पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, गडहिंग्लज पोलीस उपअधिक्षक राजीव नवले, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रणजित पाटील, रामचंद्र कोळी, विनोद कांबळे, तुकाराम राजीगरे, अजय काळे, संजय पडवळ, अनिल जाधव, पोलीस अंमलदार सारीका मोटे यांनी हा तपास केला.
भिक्षुकी बनवण्याचा संशय
चिमुरड्याचे अपहरण मुलगा नसल्याने केल्याची माहिती मोहन व छाया यांच्याकडील प्राथमिक तपासात समोर आली आहे. मात्र मोहन व छाया यांनी त्या चिमुरड्याचे अपहरण करुन त्याला भिक्षूकी बनविण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. या बाबतचा तपास सुरु आहे.








