चोरी प्रकरणी सोलापूरच्या युवकाला अटक : तिघे जण फरारी, 20 लाखाचा मुद्देमाल जप्त
बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या करणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारांच्या टोळीतील एका चोरट्याला माळमारुती पोलिसांनी अटक केली असून त्याच्याजवळून चोरीसाठी वापरलेल्या ऐशोआरामी कारसह 20 लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी ही माहिती दिली आहे. नागराज सुभाष कचेरी (वय 39, मूळचा रा. कमलापूर ता. जि. गुलबर्गा, सध्या रा. नवीन गुरुकुल कुंभारी ता. जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. त्याचे साथीदार हुसेन ऊर्फ सागर शिवाजी गायकवाड (रा. सेटलमेंट एरिया नं. 6, सोलापूर), अमोल सुर्वासे (रा. सारवाडेनगर, मोळेगाव रोड, सोलापूर) व केत्या (रा. सोलापूर) हे तिघे जण फरारी झाले आहेत.
माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक व्होनाप्पा तळवार, उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी, एम. जी. कुरेर, चिन्नाप्पगोळ, बसू बस्तवाड, चंद्रू चिगरी, के. बी. गौराणी, विश्वनाथ होसमनी, रवी बारीकर, रफिक मुजावर, शिवाजी चव्हाण, मारुती मादर, मल्लिकार्जुन गाडवी, जगन्नाथ भोसले, बसवराज कल्लाप्पनवर, तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशीद यांचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे. नागराज व त्याच्या साथीदारांनी महांतेशनगर, अंजनेयनगर, शिवबसवनगर येथे चोऱ्या केल्याची कबुली दिली असून नागराजकडून सुमारे 10 लाख रुपये किमतीचे चोरीचे दागिने व चोरीसाठी वापरण्यात येणारी एक्सयुव्ही कार (किमत 10 लाख रुपये) असा एकूण 20 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. फरारी आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. हुसेन ऊर्फ सागर, अमोल व केत्या यांना अटक झाल्यावर या टोळीने केलेले आणखी गुन्हे उघडकीस येणार आहेत. हे सर्वजण कारमधून सोलापूरहून बेळगावला यायचे. बंद घरांना लक्ष बनवायचे. या आंतरराज्य गुन्हेगाराच्या टोळीतील नागराजच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
चोरट्यांच्या कारवर ‘प्रेस’
सोलापूरहून बेळगावला येण्यासाठी हे गुन्हेगार ज्या कारचा वापर करीत होते, त्या कारवर ‘प्रेस’ असे लिहिले होते. पत्रकार व वृत्तपत्र क्षेत्रातील वाहनावर सहसा प्रेस लिहिलेले असते. त्यामुळे अनेकवेळा वाहनांची तपासणी केली जात नाही. पत्रकार असणार म्हणून त्यांची सुटका केली जाते. त्यामुळेच गुन्हेगारांनी आपल्या कारवर प्रेस असे लिहिले होते.









