वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची बाद पद्धतीने खेळविली जाणारी आघाडीची फुटबॉल स्पर्धा आणि ‘एएफसी चॅम्पियन्स लीग-2’मध्ये स्थान प्रदान करणारी ‘सुपर कप’ ही स्पर्धा 2024-25 च्या हंगामात इंग्लंडच्या ‘एफए कप’च्या धर्तीवरील नवीन स्वरुप प्राप्त करण्यास सज्ज झाली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) आगामी हंगामासाठी जाहीर केलेल्या आपल्या वेळापत्रकात 1 ऑक्टोबर, 2024 ते 15 मे, 2025 या कालावधीत ही स्पर्धा खेळविण्याचे ठरविले आहे.
‘सुपर कप’ने 2018 मध्ये देशातील तोवरची बाद पद्धतीने खेळविली जाणारी आघाडीची स्पर्धा ‘फेडरेशन कप’ची जागा घेतली. या स्पर्धेचा साधारणपणे एका महिन्यापेक्षा कमी कालावधी असायचा. ‘पण ‘एआयएफएफ’ला येत्या मोसमापासून इंग्लंडच्या ‘एफए कप’ शैलीतील ‘सुपर कप’ हवा आहे. म्हणूनच सात महिन्यांपेक्षा जास्त कालावधी ठरविण्यात आला आहे’, असे ’एआयएफएफ’च्या सूत्रांनी सांगितले. सुपर कप स्पर्धा 2024-25 च्या हंगामात शीर्षस्तरीय इंडियन सुपर लीग (आयएसएल) आणि द्वितीय श्रेणीतील ‘आय-लीग’सह जवळजवळ एकाच वेळी चालेल. स्पर्धेचा तपशील नंतर जाहीर केला जाईल.
‘फुटबॉल असोसिएशन कप ऑफ इंग्लंड’ ही बाद पद्धतीने खेळविली जाणारी वार्षिक देशांतर्गत स्पर्धा आहे. ‘प्रीमियर लीग’मधील संघांसह इंग्लंडच्या फुटबॉल क्षेत्रातील सर्व 10 स्तरांतील सर्व क्लबांसाठी ही स्पर्धा खुली आहे. ‘एआयएफएफ’द्वारे आयोजित केली जाणारी सुपर कप स्पर्धा सर्व ‘आयएसएल’ आणि ‘आय-लीग’ क्लबसाठी खुली असते. मागील सुपर कप जानेवारीमध्ये भुवनेश्वर, ओडिशात आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये 16 क्लबांनी गट स्तरावर भाग घेतला होता. सर्व ‘आयएसएल’ क्लबांनी थेट गट टप्प्यात प्रवेश केला होता, तर ‘आय-लीग’ संघांना उर्वरित चार स्थाने प्राप्त करण्यासाठी पात्रता फेरी खेळावी लागली होती.
‘एआयएफएफ’चे आगामी वेळापत्रक
? 11 वी ‘आयएसएल’ – 14 सप्टेंबर, 2024 ते 30 एप्रिल, 2025
? ‘आय-लीग’ – 19 ऑक्टोबर, 2024 ते 30 एप्रिल, 2025
? डुरँड – 26 जुलै ते 31 ऑगस्ट, 2024
? 78 वी संतोष चषक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा – 5 ते 15 नोव्हेंबर, 2024 (गट स्तर) आणि 1 ते 15 डिसेंबर, 2024 (अंतिम फेरी)
? 29 वी वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा – सप्टेंबर (गट स्तर) आणि ऑक्टोबर (अंतिम फेरी).









