कोल्हापूर :
पहाटेच्या वेळी आकाशात दाटून आलेल्या ढगामुळे कधीही पाऊस पडेल असे वातावरण तयार झाले होते. पण क्षितिजातून सूर्य वर आला आणि ढग गायब झाले.यामुळे पावसाळी वातावरणही नाहीसे झाले.दुसऱ्या बाजूला दिवसभर सूर्य तळपल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले.
हवामान विभागाने अंदाज वर्तवला नसताना 18 मार्च रोजी कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली.त्यानंतर गेली काही दिवस सकाळच्या वेळी ढगाळ वातावरण होत आहे.मात्र पाऊस पडत नाही.दुसऱ्या बाजूला सूर्य तळपत असून प्रचंड उष्मा निर्माण होत आहे. यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत.
शनिवारी पहाटेही शहरात ढगाळ वातावरण होते.यामुळे कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी शक्यता निर्माण झाली होती.मात्र ही शक्यताच ठरली.नऊ वाजता आकाश पूर्ण निरभ्र झाले, तर दुसऱ्या बाजूला प्रचंड उकाडा जाणवला. अंगातून घामाच्या धारा वाहिल्या. या उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिकांची पावले शीतपेये आणि फळांच्या स्टॉलकडे वळली. यामुळे या स्टॉलवर गर्दी झाली होती.
- तापमान– अंश सेल्सियसमध्ये
कमाल–37.8
किमान–25.8








