पुणे / प्रतिनिधी :
उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरात आणखी एका कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली असून, यामुळे बुधवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली. यात विदर्भाच्या अनेक जिल्हय़ांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
बऱ्याच खंडानंतर राज्यात पाऊस परतला असून, सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. यापूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सून सक्रिय झाला आहे. त्यानंतर मंगळवारी पुन्हा आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र दक्षिण ओरिसा ते उत्तर आंध्र किनारपट्टीदरम्यान असून, येत्या 24 तासांत ते पश्चिमेकडे प्रवास करीत दक्षिण ओरिसा ते दक्षिण छत्तीसगडच्या दिशेने प्रवास करणार आहे. याच्या प्रभावामुळे राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे.
सर्वदूर पाऊस
कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे दक्षिण, पूर्व, मध्य तसेच पश्चिमेच्या भागात ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मंगळवारी पूर्व किनारपट्टीवरील बहुतांश राज्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ होता. बुधवारी विदर्भातील अनेक जिल्हय़ांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
पाऊस जोर धरणार…
महाराष्ट्रात बुधवारपासून पावसाची तीव्रता वाढणार आहे. त्यातही 7 व 8 सप्टेंबर रोजी पाऊस अधिक असेल. यात अनेक जिल्हय़ांना पुढील पाच दिवस यलो अलर्ट आहे. विदर्भातील अनेक जिल्हय़ांना बुधवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, 1 ते 5 सप्टेंबरची आकडेवारी पाहता सांगली तसेच सोलापूर जिल्हय़ात पावसाची स्थिती चांगली आहे. सरासरीपेक्षा अधिक पाऊस येथे नोंदविण्यात आला आहे. याबरोबरच लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली येथेही सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. दरम्यान, 1 जूनपासूनची आकडेवारी पाहता महाराष्ट्रात सरासरीच्या उणे 13 टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे.
पाऊस तुटीचाच
दुसरीकडे राज्यातील जिल्हय़ांची स्थितीही फारशी बरी नाही. 1 जूनपासूनच्या आकडेवारीनुसार, कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ातील बहुतांश जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातील जिल्हय़ात अवर्षणाची स्थिती आहे.
सातारा, सांगली, सोलापूर अवर्षणात
सातारा, सांगली, सोलापुरात पावसाची स्थिती गंभीर असून, या भागात अवर्षणाची स्थिती आहे. साताऱयात सरासरीच्या उणे 39, सांगली उणे 38, सोलापूर उणे 23 टक्के पाऊस झाला आहे.
दुष्काळाच्या छायेत
सप्टेंबर महिन्यात हवामान विभागाने महाराष्ट्रात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. सध्याही राज्यात पावसाचा जोर केवळ एक ते दोन दिवस अधिक आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास राज्यभर पाऊस कमी राहण्याची चिन्हे आहेत.
बुधवार : ऑरेंज अलर्ट : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा,
यलो अलर्ट : जोरदार पाऊस
मराठवाडा, विदर्भातील सर्व जिल्हे
याशिवाय सातारा, सांगली, कोकणातील काही जिल्हय़ात पावसाचा अंदाज
गुरुवार : यलो अलर्ट
महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हय़ांना यलो अलर्ट
शुक्रवार : यलो अलर्ट
मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, रायगड, रत्नागिरी
शनिवार : यलो अलर्ट
कोकण, मराठवाडय़ात पाऊस








