नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ : शिवारही जलमय : शेतातील कामे ठप्प
वार्ताहर/सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागांमध्ये दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून पूर्वभागातील नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर शिवारही जलमय झाले आहे. त्यामुळे शेतातील सर्व कामे ठप्प झाली आहेत. पूर्व भागातील बसवण कुडची, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी, मुतगे, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनिहाळ, पंत बाळेकुंद्री, मोदगा, मारिहाळ, सुळेभावी गावांमध्ये दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी सर्व शिवार जलमय झाले आहे. तसेच बसवण कुडची शिवारातून गेलेल्या बळळारी नाला, सांबरा व बाळेकुंद्री खुर्द येथील नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास नाल्यांना पूर येण्याचा अंदाज शेतकरी वर्गातून वर्तविण्यात येत आहे. या भागात सोमवारपासून पावसाचा जोर वाढला असून मंगळवारीही पावसाची रिपरिप सुरूच होती. परिणामी पेरणी व भांगलणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. मध्यंतरी उघडीप मिळाल्याने शेतकऱ्यांनी भातपिकात कोळपणीच्या कामाला प्रारंभ केला होता. मात्र पावसामुळे कोळपणी खोळंबली आहे.









