एकीकडे दहीहंडी आणि गणेश उत्सवाची चाहूल लागली आहे तर दुसरीकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडी यांनी निवडणूक पूर्व रणवाद्ये वाजवायला सुरुवात केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची तर गंमतजंमतच सुरु आहे. या सगळ्यात सुखाची एक झुळूक म्हणजे गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे. तथापि डाळ, तांदूळ महागल्याने वरण-भात व ज्वारी महागल्याने भाकरी-आमटी सुखाने खाणे कठीण झाले आहे. वाढती महागाई व बेरोजगारी अनेक जिह्यात पावसाने पाठ फिरवल्याने वाया गेलेला खरीप हंगाम याकडे कुणाचे लक्ष नाही. तलाव, उपसा सिंचन योजनांतून पाण्याची पळवापळव सुरु आहे. नदी, नाले, ओढे कोरडे पडले आहेत. येणारा काळ शेतकऱ्यांसाठी अवघड आहे.परतीचा पाऊस चांगला झाला नाही तर पिण्याच्या, उद्योगाच्या पाण्याचा प्रश्न तीव्र होण्याची भीती आहे. पण कोणालाच कशाची उरलेली नाही. जो तो आपले राजकीय स्वार्थ रेटताना दिसतो आहे. मुदतपूर्व निवडणुका आणि समान नागरी कायदा विधेयक व संसदेचे विशेष अधिवेशन यामुळे राजकारणाची तीव्रता वाढली आहे. ‘कुणाचे वय झाले, तुमची तब्येत बरी आहे ना ?’ असे सवाल करत वय विसरुन ज्येष्ठ नेते शरद पवार महाराष्ट्राचे आणि देशाचे राजकारण आपल्या भोवती फिरवत आहेत. सत्तेशिवाय राहायचे नाही आणि आपल्या स्वार्थाला वैचारिक पाया आहे असे भासवायचे यात पवार तरबेज आहेत. त्यामुळे काँग्रेसमधून फारकत घेऊन त्यांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी येन-केन अपवाद वगळता कायम सत्तेत राहिली आहे. चौकशा, इडिची लफडी व मनोकामना याचा मेळ घालत त्यांनी भाकरी फिरवताना त्यांची निम्मी भाकरी सत्तेत गेली आणि उर्वरित इंडिया आघाडीत. पवार काका पुतण्याचे स्नेह कायम आहे. ते उद्योगपतीच्या घरात एकमेकांना भेटतात, धोरणे ठरवतात. एकमेकांवर चिखल उडू देत नाहीत आणि दोघे मिळून मतदारांना व भाजपा, काँग्रेससह सर्वांना मूर्ख ठरवत आपली पोळी भाजून घेतात. इंडिया आघाडीची दोन दिवसाची तिसरी बैठक मुंबईत ‘ग्रँण्ड हयात’ या पंचतारांकित
हॉटेलमध्ये गुरुवार-शुक्रवार अशी दोन दिवस भरली होती. ‘जुडेगा भारत, जितेगा इंडिया’ असे म्हणत इंडिया आघाडीने, जागा वाटप, आघाडीचा निमंत्रक, आघाडीचा नेता, लोगो, निवडणूक मुद्दे यावर विचारमंथन केले आहे. या बैठकीत लोगो व जागा वाटप होईल अशी अपेक्षा होती पण त्यासाठी सूत्र व समिती यापलीकडे फारसे काही ठरलेले नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पंतप्रधान राष्ट्रपती असे पद अनेक वर्षे खुणावते आहे. पण ते मिळालेले नाही. पवारांच्या पक्षाची संख्या डब्बल डिजीटमध्ये जात नाही. साडेतीन जिह्यांचा पक्ष अशी त्यांच्या पक्षाची टिंगल होते. आता तर या साडेतीन जिह्यात अजितदादा व त्यांच्यात सामना शक्य आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपा सोबत गेली तर पवारांना केंद्रातले नंबर वनचे पद मिळणार नाही. फार तर नीती आयोगाचे अध्dयाक्षपद देतील. ओघानेच शरद पवार इंडिया आघाडीत आहेत व त्यांचे आमदार, खासदार अजितदादांच्या नेतृत्वाखाली भाजपा युतीत सहभागी आहेत. ईडीने नुकत्याच दाखल केलेल्या राज्यबँक घोटाळ्याच्या आरोपपत्रात अजित पवारांना वगळले आहे. हे पुरेसे बोलके आहे. कुणाच्याच कोलांट्या उड्या आणि स्वार्थी तडजोडी यांना वैचारिक, सामाजिक अधिष्ठान नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणी काय होणार हा प्रश्नच आहे. इंडिया आघाडीची पत्रकार परिषद चालू असताना शरद पवारांना अजितदादांचा आलेला फोन स्पीकरवर पडला व माईकमधून तो सर्वांना कळला. सोशल मीडियावर या फोनचा आवाज व्हायरल झाला आहे. यातून कौटुंबिक संबंध व राजकीय भूमिका अधोरेखित होत असल्या तरी सर्वांना सर्व समजले आहे. त्यामुळे इंडिया आघाडी निवडणुकीपूर्वी कशी आकार घेते, कोणत्या चिन्हावर लढते आहे व निकालानंतर काय भूमिका घेते हा कुतुहलाचा विषय आहे. फोडाफोडी व जुळवाजुळव करुन पंतप्रधान निवडायची वेळ आली तर आपली भूमिका महत्त्वाची ठरावी याची दक्षता शरद पवार, नितीश कुमार, मायावती घेणार हे वेगळे सांगायला नको. एकूणच आघाडी आकार घेती आहे. जागा वाटप, निमंत्रक आणि नेता यानंतर खरे चित्र समोर येईल पण ‘मोदी विरोधक’ एकवटले आहेत. याच दरम्यान नरेंद्र मोदी, अमित शहा, शांत नाहीत. बारामतीसह अनेक लोकसभा मतदारसंघात त्यांनी क्षेत्ररक्षण लावले आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील फूट भाजपा युतीच्या फायद्याची ठरेल असे दिसते आहे. आघाडी व युती दोन्हीकडे विद्यमान आमदार-खासदार यांना तिकीट हे सूत्र जवळजवळ पक्के आहे. त्यामुळे ठाकरे सेना विरुद्ध शिंदेसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी विरोधी शरद पवारांची राष्ट्रवादी असे सामने अनेक जागी दिसतील. गणपती उत्सव, दहीहंडी यांचेही आकर्षण आहे. 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. या अधिवेशनात महत्त्वाची दहा विधेयके मांडली जाणार असे सांगितले जाते. पावसाळी अधिवेशनात अविश्वास ठरावाच्या चर्चेवर बराच वेळ खर्ची पडला म्हणून हे अधिवेशन आहे असे म्हटले जाते. या अधिवेशनात समान नागरी कायदा, वन नेशन वन इलेक्शन किंवा सत्ताकाळ पूर्ण होण्यापूर्वीच मुदत पूर्व निवडणूका घोषणा असे काही अद्भूत असेल असेही बोलले जाते. सरकारने अमृतकाळ म्हणत गाजर दाखवले आहे. विशेष अधिवेशनात लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्याची घोषणा झाली तर आश्चर्य नको. महाराष्ट्रात भाजपा-सेना युतीची सत्ता होती व राणे मुख्यमंत्री होते तेव्हा आणि केंद्रात वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा फिलगुड म्हणत भाजपाने मुदतपूर्व निवडणुका घेतल्या होत्या. कर्नाटकाचा कौल, इंडिया आघाडीची तयारी आणि चांद्रयान आदित्ययान याचा लाभ घेत विरोधकांच्या तयारीपूर्वी गेंधळ उठवून निवडणुका घेण्याची व्यूहरचना असू शकते. तूर्त अधिवेशनात काय ठरते, भाजपा निवडणुकीसाठी काय भूमिका घेते आणि शरद पवार कसे पत्ते पिसतात हे चर्चेचे विषय झाले आहेत. समान नागरी कायदा होणार का? झाला तर त्याचा परिणाम काय होईल यासह अनेक प्रश्न चर्चेचे आहेत. पण सामान्य माणूस सिलिंडर स्वस्त झाला व डाळ महागली यामुळे तर पाऊस नाही, खरीप हंगाम वाया गेला म्हणून शेतकरी चिंतेत आहे.
-आज्ञा कोयंडे








