पुणे / प्रतिनिधी :
बंगालच्या उपसागरातील ‘मोचा’ (मोखा) या वादळाची तीव्रता वाढून त्याचे शुक्रवारपर्यंत तीव्रचक्रीवादळात रुपांतर होण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
गुरुवारदुपारपर्यंत हे वादळ ताशी 6 किमी वेगाने त्याच्या उत्तरेकडे प्रवास करीत होते. गुरुवार सांयकाळी तसेच शुक्रवार सकाळपर्यंत टप्प्याटप्याने या वादळाची तीव्रता वाढणार असून, मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत ते पोहोचेल. यानंतर हे वादळ आपला मार्ग बदलून उत्तर उत्तरपूर्वेच्या देशेने प्रवास करेल तसेच प्रवास करता करता त्याची तीव्रता आणखीन वाढेल. 14 मे च्या दुपारी हे वादळ बांग्लादेश ते उत्तर म्यानमारच्या किनारपट्टीदरम्यान धडकणार असून, यावेळी ताशी 160 ते 170 किमी वेगाने वारे वाहतील. याच्या प्रभावामुळे पूर्वोत्तर राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज असून, अलर्ट घोषित करण्यात आला आहे. याबरोबरच बंगालचा उपसागर खवळलेला राहणार असून, मच्छीमार, प्रवासी बोटींना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे.
कोकण-मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट
मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागात गुरुवारी उष्णतेची लाट नोंदविण्यात आली. तापमानाचा पारा 40 अंशाच्या वर गेला आहे. कोकणात शुक्रवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.









