वार्ताहर/येळ्ळूर
मंगळवारपेक्षा बुधवारी पावसाचा जोर जरा कमी झाला असला तरी पाण्याची स्थिती जैसे थेच असल्याने येळ्ळूर, सुळगा, धामणे गावासह अन्य परिसरातील भातपिके अजूनही पाण्याखालीच आहेत. आपले पीक वाचविण्यासाठी वाफ्यातील पाण्याचा निचरा कसा करता येईल, या विचाराने शेतकरी सकाळ, संध्याकाळ शिवारात फेऱ्या मारतो आहे. परत सायंकाळी पावसाने जोर धरल्याने त्याची चिंता वाढली आहे. सध्याच्या हवामानाची स्थिती बघता पावसाचा जोर एकदोन दिवस असाच सुरू राहिल, असे वाटते. असे झाले तर कोवळ्या भातरोपांना पाण्याचा फटका बसून ती कुजण्यास सुरुवात होतील. त्यामुळे वाफ्यातील पाण्याचा निचरा कसा होईल याचा कसोशीने प्रयत्न करण्यात शेतकरी गुंतला आहे. पावसाचा फटका भात, सोयाबीन, बटाटे, भुईमूग, पिकांना मोठ्या प्रमाणात बसला असून यरमाळहट्टी, धामणे, देसूर, नंदिहळ्ळी परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. ऐन हंगामातील भांगलण व कोळपणीची कामे पावसामुळे ठप्प झाली असून शिवार जलमय झाल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे. अजून पूर्ण पावसाळा पुढे असल्याने पुढचा काळ कसा असेल या विचारात आहे.









