अध्याय दुसरा
अर्जुनाला निष्काम कर्मयोगाची माहिती देताना भगवंत म्हणाले, निष्काम कर्मयोगाचे जो आचरण करेल त्याला कर्मबंध मुळीच बाधत नाही. तो इतर काय करत आहेत ह्याकडे पहात न बसता कामाला सुरवात करून टाकतो. येथे ऐहिक सुखांचा नाश न होता मोक्षसुखही मिळते. योगी, संत, अशा ब्रम्हस्थितीस प्राप्त झालेल्या व्यक्तींच्या बुद्धीत कर्मफळांचा विचारच येत नाही. कर्मफळाची अपेक्षाच संपुष्टात आल्याने आपली परमेश्वराशी एकरूपता व्हावी अशी सदबुद्धि त्यांच्याठायी विकसित झालेली असते.
अशा व्यक्ती त्रिगुणांच्या प्रभावक्षेत्राबाहेर पोहोचलेल्या असतात. ही सद्बुद्धी प्राप्त होणे दुर्मिळ आहे कारण मोहाला आळा घालणे फार कठीण असते म्हणून अंत:करणात थोडीशी जरी सद्बुद्धी निर्माण झाली तर ती अनंत जन्माची पुण्याई आहे असे समजावे. केवळ सदबुद्धीच माणसाला ईश्वरप्राप्ती करून देते. फळाची अपेक्षा करणाऱ्यांची बुद्धी ही दुर्बुद्धी समजावी.
अशा दुर्बुद्ध लोकांना आत्मसुखाचे दर्शन न होता स्वर्ग, संसार किंवा नरकावस्था प्राप्त होतात. ज्यांना चांगलं काय आणि वाईट काय हेच कळत नसतं अशा अविवेकी लोकांना कर्मफळाचं महत्त्व वाटत असतं. वेदात असंच सांगितलंय असा ते अविवेकी लोक वाद घालत असतात. त्याबद्दल पुढील श्लोकात भगवंत म्हणतात,
अविवेकी वृथा वाणी बोलती फुलवूनिया । वेदाचे घालिती वाद म्हणती दुसरे नसे ।। 42 ।।
वेदामध्ये अमुक अमुक कर्म करा म्हणजे त्याचे अमुक अमुक फळ मिळेल असे सांगितले आहे परंतु तसे सांगण्यामागचा उद्देश असा की, माणसाने निदान कर्मफळाच्या अपेक्षेने का होईना पण कर्म करावे. त्याप्रमाणे फळाच्या आशेने कर्म करायला मनुष्य सुरवात तर करतो पण काही काळाने त्याच्या असे लक्षात येते की, मिळणारे फळ हे नाश पावणारे असल्याने त्याच्या अपेक्षेने कर्म करण्यापेक्षा निरपेक्षपणे कर्म करणे उचित आहे. वेदांच्या सांगण्यातला हा अंतरीचा हेतू लक्षात न घेणारे महाभाग काय सांगतात ह्याकडे माउली त्यांच्या विवरणात आपले लक्ष वेधतात.
श्लोकाच्या विवरणात ते म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, वेदांच्या नुसत्या अर्थात रममाण झालेले अविवेकी लोक वेदात सकाम कर्माशिवाय दुसरे काही नाही, असे साधार बोलतात. त्यांच्यादृष्टीने केवळ कर्मफलच महत्त्वाचे असते. कर्मफळाची आसक्ती, लोभ त्यांच्या हृदयात असतो. पुढील श्लोकात अशा पढत पंडितांच्या सांगण्याकडे आपले लक्ष वेधताना भगवंत म्हणतात, कर्म करून भोगवैभवाचा उपभोग घ्यावा असे ह्या पंडित मंडळीचे म्हणणे असते.
जन्मूनिया करा कर्मे मिळवा भोग-वैभव । भोगा कर्म-फळे गोड सांगती स्वर्ग-कामुक ।। 43।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतानी अर्जुनाला असे सांगितले की, वेदांचे पुस्तकी ज्ञान घेतलेल्या पंडितांच्या म्हणण्यानुसार, मृत्यूलोकी जन्माला यावे, यज्ञादि कर्मे करावीत व आल्हाददायक अशा मनोहर स्वर्गसुखाचा उपभोग घ्यावा ह्यासारखे दुसरे सुख नाही. हे अविचारी लोक सुखाच्या उपभोगाकडे लक्ष ठेवून, त्यासाठी आवश्यक त्या फळाची इच्छा मनात धरून कर्मे करतात. शास्त्रशुद्ध विधीप्रमाणे अनेक प्रकारची अनुष्ठाने मन लावून करतात आणि त्यात यत्किंचितही चूक न होऊ देता अगदी दक्षतेने धर्माचरण करतात. त्यांना असं वाटतं की, हे आणि असंच करायला वेदांनी सांगितले आहे. अशा पद्धतीने सकाम कर्मे करून ते पुण्यासाठा करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा उपभोग घेण्यासाठी पुनर्जन्म घेतात.
क्रमश:








