पंतप्रधान मोदी आज-उद्या राजस्थान-गुजरात दौऱ्यावर
पंतप्रधान मोदी आज-उद्या राजस्थान-गुजरात दौऱ्यावर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार, 27 जुलै आणि शुक्रवार, 28 जुलैला राजस्थान आणि गुजरात दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राजस्थानमधील सीकर येथून पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत. तसेच केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांना लाभ पोहोचवणाऱ्या योजनेंतर्गत पंतप्रधानांच्या हस्ते 1.25 लाख पीएम किसान समृद्धी केंद्रे देशाला समर्पित केली जाणार आहेत.
पंतप्रधान गुरुवारी सकाळी 11 वाजता राजस्थानमधील सीकर येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात विविध विकासकामांची पायाभरणी करतील. तसेच काही प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. युरिया गोल्ड या सल्फर आवरणयुक्त युरियाचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण केले जाणार आहे. तसेच पंतप्रधानांच्या उपस्थितीत ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सवर 1,500 शेतकरी उत्पादक संघटनांना समाविष्ट केले जाणार आहे. त्याचबरोबर आरोग्यविषयक सुविधांना मोठे पाठबळ देण्यासाठी पाच नव्या वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन करण्याबरोबरच सात वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणी करणार आहेत. राजस्थान दौरा आटोपून ते गुजरातला जाणार आहेत. तेथे राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसेच 860 कोटी ऊपयांच्या विविध विकास प्रकल्पांचेही त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर गांधीनगर येथील सेमीकॉन इंडिया 2023 चे उद्घाटनही करतील.









