महेंद्र (भैय्या) मोहिनीराज गंधे यांचे विचार : सामुदायिक उपनयन सोहळा उत्साहात
बेळगाव : बेळगावातील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण समाजाने अनेक वर्षांपासून सामुदायिक उपनयन उपक्रम चालू ठेवला आहे. हा स्तुत्य उपक्रम आहे, असे विचार अखिल देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ मुंबईचे अध्यक्ष महेंद्र (भैय्या) मोहिनीराज गंधे यांनी बोलताना व्यक्त केले. सोमवारी चिदंबरनगरातील चिदंबर देवस्थानात देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाच्यावतीने आणि समर्थ अर्बन को-ऑप.व्रेडिट सोसायटीच्या सहकार्याने आयोजिलेल्या सामुदायिक उपनयन समारंभास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ‘समर्थ’चे चेअरमन अॅड. अजय सुनाळकर यांनी संस्थेच्या उपक्रमाचा आढावा घेतला आणि गेल्या 26 वर्षांपासून सातत्याने आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. यंदा पाच बटूंच्या मुंजी करण्यात आल्या, अशी माहिती त्यांनी दिली. संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनी यापुढेही सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दुसरे पाहुणे अखिल जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्टचे अध्यक्ष उद्योजक राम भंडारे यांनी उद्योग व्यवसायातील ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी आपण बेळगाव जिल्हा ब्राह्मण संघाची स्थापना केली असल्याची माहिती दिली. अशा कार्यक्रमात समाजाचा सहभाग मोठ्या प्रमाणात व्हायला हवा, असे मत व्यक्त केले. या भागाच्या नगरसेविका आणि उपमहापौर वाणी जोशी यांचेही शुभेच्छापर भाषण झाले. ‘समर्थ’च्या संचालिका सुनंदा आळतेकर यांनी सूत्रसंचालन केले. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे सचिव अऊण कुलकर्णी यांनी आभार मानले. याप्रसंगी देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष विजेंद्र जोशी, चेअरमन विनायक जोशी, ‘समर्थ’चे व्हाईस चेअरमन अभय जोशी, संचालक गणपत कुलकर्णी, प्रदीपकुमार कुलकर्णी, अरविंद कुलकर्णी, मालतेश पाटील, छाया जोशी, अनिल भंडारी, उमेश सुणगार, परशुराम कांबळे, अशोक पुजारी आदी उपस्थित होते.









