वार्ताहर/धामणे
धामणे गावचे कुलदैवत श्री बसवाण्णा देवाची मोठ्या उत्साहाने दोन दिवस सुरू असलेली यात्रेची हरहर महादेवच्या जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत इंगळ्यांच्या कार्यक्रमाने मंगळवार दि. 25 रोजी सायंकाळी सांगता झाली. सोमवार दि. 24 रोजी पहाटे बसवाण्णा देवाला अभिषेक घालून विधीवत देवाचे पूजन झाले. त्यानंतर येथील श्री कलमेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीचे विधीवत पूजन करण्यात येवून इंगळ्यांच्या गाड्यांना सुरुवात झाली. कलमेश्वर मंदिरपासून बसवाण्णा मंदिरापर्यंत सवाद्य मिरवणुकीने दुपारी 4 वाजेपर्यंत गाडे मिरवणूक सुरू होती. त्यानंतर गावातील हक्कदारांचे आंबिल गाडे बसवाण्णा मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यात आल्या.
त्यानंतर बसवाण गल्लीत 5.30 वाजता परंपरेप्रमाणे गाडे पळविण्याचा कार्यक्रम देवस्थानी पंचकमिटी व शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. रात्री 10 ते 6 वाजेपर्यंत मंदिरासमोर कन्नड शाहीर गाण्याचा कार्यक्रम झाला. मंगळवार दि. 25 रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी येथील सर्व मंडळांचे सजविलेल्या बैलजोड्यांचे गाडे गुलालाची उधळण करत गावभर मिरवणूक काढण्यात आल्या. दुपारी 1 वाजता देवस्थान पंचकमिटी व भाविकांच्या उपस्थितीत बसवाणा मंदिरासमोर इंगळ्या रचवून त्याचे विधिवत पूजन करून इंगळ्या पेटविण्यात आल्या. त्यानंतर सायंकाळी बसवाण्णा देवाला अभिषेक घालण्यात येवून बाशिंग बांधून विधिवत पूजन करण्यात येवून हक्कदारांना पानविडे देवून इंगळ्यामध्ये नारळ उडविण्यात आले.









