डोळ्यांचे पारणे फेडणारा क्षण : मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलला
वार्ताहर/सांबरा
हर हर महादेवच्या गजरात मंगळवारी बसवण कुडची येथे इंगळ्यांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दरम्यान, डोळ्यांचे पारणे फेडणारा हा क्षण पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. त्यामुळे मंदिर परिसर अक्षरश: भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. येथील श्री बसवाण्णा, श्री कलमेश्वर व श्री ब्रह्मदेवाची यात्रा ही इंगळ्यांची यात्रा म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. या यात्रेला बेळगावसह आजूबाजूच्या गावांतून भाविक मोठ्या संख्येने येतात. सकाळपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दुपारनंतर भाविकांच्या गर्दीत वाढ झाली.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जोरदार पावसानेही हजेरी लावली. मात्र, पावसाची तमा न बाळगता भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास धार्मिक विधी पार पडला. त्यानंतर हर हर महादेवचा गजर करत भाविकांनी इंगळ्यांतून धावण्यास प्रारंभ केला.हा क्षण पाहण्यासाठी मंदिर परिसर चोहोबाजूंनी भाविकांनी तुडुंब भरला होता. सायंकाळनंतर मोठ्या संख्येने भाविक गावात दाखल होत होते. त्यामुळे गावच्या मुख्य रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती. रहदारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना बरेच परिश्रम घ्यावे लागले. रात्री गावात घरोघरी जेवणासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे गावातील सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. रात्री उशिरापर्यंत गावात भाविकांची गर्दी झाली होती. बुधवार दि. 26 व गुऊवार दि. 27 रोजी गावात खळ्याच्या कुस्त्या होणार आहेत.









