श्रीपूजक माधव मुनीश्वर यांचे न्यायालयात शपथपत्र दाखल : ॲड.नरेंद्र गांधी यांची माहिती
पुढील सुनावणी 21 मार्च रोजी
कोल्हापूर प्रतिनिधी
करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनासंदर्भात जो काही निर्णय घेतला जाणार आहे. त्याची माहिती सर्वप्रथम न्यायालयाला द्यावी, अशी मागणी हक्कदार श्रीपूजक माधव वासुदेव मुनीश्वर यांनी एका शपथपत्राव्दारे जिल्हा न्यायालयात केली आहे. बुधवारी मुनीश्वर यांचे वकील ॲड. नरेंद्र गांधी यांनी अर्ज दाखल केला. या अर्जावर सहावे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश व्ही.डी.भोसले यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पुढील सुनावणी 21 मार्च रोजी होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने मंगळवारी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी करवीर निवासिनी अंबाबाई मुर्तीची पाहणी केली. या पाहणीतील काही संदर्भ देवून बुधवारी हक्कदार श्रीपूजक माधव मुनीश्वर यांनी न्यायालयात शपथपत्र सादर केले आहे. या शपथपत्रात म्हटले आहे, श्री करवीर निवासीनी अंबाबाई देवीचे मुर्तीचे पुन्हा संवर्धन करण्याचे कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले होते. त्याप्रमाणे काही अधिकाऱ्यांना मुर्तीची पाहणी करण्यासाठी बोलविले होते. याबाबत माहिती कळाल्यानंतर मी (श्रीपूजक मुनीश्वर) त्यांच्यासोबत मंदिराच्या आतील गाभाऱ्यात हजर राहिलो. त्यावेळी एकूण चार अधिकारी (दि. 14 मार्च) मुर्तीची पाहणी करण्यासाठी सकाळी नऊच्या सुमारास आले होते. पाहणी करीत असताना त्यातील एका अधिकाऱ्याने मुर्तीच्या चेहऱ्यावर 18 सप्टेंबर 2022 रोजी व त्यापूर्वी केलेल्या संवर्धनाचा लेप काढला. थोडावेळ पाहणी करून ते अधिकारी तेथून निघून गेले. तपासणी करणारे अधिकारी हे आतील गाभाऱ्यात साधारण 25 मिनिटे होते.
परवानगीविना पाहणी
श्री अंबाबाईच्या मूर्तीला हात लावण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. मंगळवारी (14 मार्च) आलेल्या अधिकाऱ्यांनी कोणाची परवानगी घेतली याची माहिती नाही. पाहणी करणारे अधिकारी तज्ञ नाहीत.
ॲड नरेंद्र गांधी, श्रीपूजकांचे वकील