पावलोपावली चालते लूटमार : पर्यटकांची पावले अन्य राज्यांकडे,पर्यटनाचा ’खाण’ व्यवसाय होण्याची भीती
पणजी : आधीच ड्रग्ज, वेश्याव्यवसाय, ’डान्स बार’ संस्कृती यामुळे नाव बदनाम झालेल्या गोव्यात आता दलालांचा सुळसुळाट वाढला असून हे सर्व प्रकार केवळ पर्यटन व्यवसायावरच मदार असलेल्या गोव्याच्या मुळावर उठू लागले आहेत. पर्यटन क्षेत्रात चालणारी दलाली, लुटमार, त्रास आणि छळणुकीला कंटाळून पर्यटक आता गोव्याकडे पाठ करू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातून पर्यटक गोव्यापेक्षा शेजारील महाराष्ट्र राज्यातील मालवण सारख्या समुद्रकिनाऱ्यांना जास्त पसंती देऊ लागल्याचे समोर आले आहे. पर्यटन क्षेत्रात पावलोपावली चालणारी ही दलाली सध्या राज्यासमोरील सर्वात मोठी समस्या बनू लागली आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकावर दलालांच्या धोक्याचा सामना करण्याची वेळ येऊ लागली आहे. त्यामुळे गोव्याची भेट संस्मरणीय ठरण्यापेक्षा कटू ठरू लागली आहे. स्थानिक पोलीस ही दलाली नष्ट करण्यावर भर देत असले तरी त्यांचे हे प्रयत्न अपुरे पडत आहेत.
राज्यातील बहुतेक किनाऱ्यांवर दलालांनी स्वत:ची साम्राज्ये उभारली आहेत. बहुतेक पर्यटक येथील समुद्रकिनाऱ्यांना भेट देत असल्याने या भागात दलालांचा पावलोपावली सुळसुळाट वाढला आहे. त्याच वेगाने मसाज पार्लस्, डान्स बार, वेश्या व्यवसाय केंद्रे, कॅसिनो यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या नावाखाली दलालांकडून प्रचंड लुटमार होत आहे. हे प्रकार एवढ्यावरच न थांबता मसाज देण्याच्या नावाखाली निर्जन ठिकाणी नेऊन प्रसंगी मारहाण सुद्धा करून या दलालांनी लुटल्याची अनेक उदाहरणे आहेत. हल्लीच्या काही वर्षात राज्यात पर्यटन क्षेत्रात जलक्रीडा तसेच पॅरासेलिंग हे नवीन उपक्रम उदयास आले आहेत. परंतु तेथेही दलालांनी शिरकाव केला असून केवळ 350 ऊपये फी असलेल्या ठिकाणी तब्बल 800 ऊपये आकारले जात आहेत. तर पॅरासेलिंगसाठी जेथे 800 ऊपये फी असताना तब्बल 3000 ऊपये आकारण्यात आल्याची उदाहरणे आहेत. रेन्ट अ बाईक वा कार, पर्यटक भाडोत्री कार यांच्याकडून होणाऱ्या लुटीस तर मर्यादाच राहिलेली नाही, हे वेळोवेळी सिद्धच झालेले आहे. येथील हॉटेल्सचे दरही अन्य राज्यांच्या तुलनेत प्रचंड महाग असल्याचे काही पर्यटकांनीच प्रसारमाध्यमांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
हे सर्व प्रकार आता पर्यटन क्षेत्रासाठी मोठी समस्या निर्माण करणारे ठरू लागले आहेत. विदेशी पर्यटकांनी तर राज्याकडे पाठच केली असून समुद्रकिनाऱ्यावर हिप्पी दिसणे विरळ होत आहे. अशावेळी राज्याची मदार केवळ देशी पर्यटकांवरच असून त्यांचीही दलालांकडून लूट होऊ लागल्यास पर्यटनाचा खाण व्यवसाय होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. त्याशिवाय अनेक दलाल येथे येणाऱ्या पर्यटकांना शेजारील राज्यांमध्ये ’सी राईड पॅकेज’ ऑफर करून भुरळ घालतात, त्यातून महाराष्ट्रातील मालवण आणि कर्नाटकातील कारवारसारख्या ठिकाणी पर्यटकांना नेण्यात येते, अशी माहितीही प्राप्त झाली आहे. अशा दलालांवर कारवाई करण्याचा इशारा यापूर्वी पर्यटन खात्याने दिला होता. परंतु हे इशारे सहजतेने घेत दलाल आपली लुटमार चालूच ठेवतात, असे पाहणीत दिसून आले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून अन्य राज्यांमध्ये गोव्याबद्दल वाईट प्रतीमा निर्माण होत असून येथे येण्याच इच्छुक बरेच पर्यटक आपला मोर्चा शेजारील महाराष्ट्र वा कर्नाटक आदी राज्यांमधील पर्यटन स्थळांकडे वळवित असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोप विमानतळामुळे पर्यटकांना आता मालवणसारख्या ठिकाणी जाणे सहज सुलभ बनले असून त्यातून गोव्यासाठी कडवी स्पर्धा निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.









