दक्षिण आफ्रिकन संघाचे उद्या भारतात आगमन, उभय संघातील मालिका पुढील आठवडय़ापासून
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्ध होणाऱया 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ दि. 5 जून रोजी नवी दिल्लीत एकत्रित येणार आहे. भारत-द. आफ्रिका यांच्यातील पहिली टी-20 दि. 9 जून रोजी खेळवली जाणार असून द. आफ्रिकन संघ यासाठी उद्या (दि. 2) भारतात दाखल होईल.
भारत-द. आफ्रिका यांच्यातील या मालिकेसाठी प्रेक्षक प्रवेशावर कोणतीही मर्यादा नसेल. शिवाय, बायो-बबल देखील नसेल. मात्र, सर्व खेळाडूंची नियमित कोरोना चाचणी होत राहणार आहे.
दि. 9 जून रोजी पहिल्या लढतीनंतर कटक (दि. 12), विशाखापट्टणम (दि. 14), राजकोट (दि. 17) व बेंगळूर (दि. 19) येथे उर्वरित 4 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ दि. 5 रोजी एकत्रित येईल तर दक्षिण आफ्रिकन संघ दि. 2 रोजी नवी दिल्लीत दाखल होईल, असे दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव राजन मनचंदा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
रोहित, विराटसह वरिष्ठांना विश्रांती
भारतीय संघातील खेळाडू अलीकडेच संपन्न झालेल्या आयपीएल स्पर्धेत सलग 2 महिने व्यस्त होते. ही मालिका संपन्न झाल्यानंतर सर्व जण विश्रांतीसाठी घरी परतले. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी नियमित कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, जसप्रित बुमराह आदी सर्व क्रिकेट प्रकारात खेळणाऱया वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. रोहितच्या गैरहजेरीत केएल राहुल भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व भूषवणार आहे. रिषभ पंतकडे उपकर्णधारपद सोपवले गेले आहे. आयपीएलमध्ये उत्तम वर्चस्व गाजवलेल्या अर्शदीप सिंग व उमरान मलिक यांना या मालिकेच्या माध्यमातून राष्ट्रीय संघात पदार्पणाची संधी मिळाली आहे.
भारतीय टी-20 संघ ः केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (उपकर्णधार), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, वेंकटेश अय्यर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
भारत-द. आफ्रिका टी-20 मालिकेची रुपरेषा
तारीख / लढत / ठिकाण
9 जून / पहिली टी-20 / नवी दिल्ली
12 जून / दुसरी टी-20 / कटक
14 जून / तिसरी टी-20 / विशाखापट्टणम
17 जून / चौथी टी-20 / राजकोट
19 जून / पाचवी टी-20 / बेंगळूर.









