पाचवी कसोटी आजपासून, भारतीय संघ आघाडी 4-1 वर नेण्यासाठी प्रयत्नशील, अश्विन-बेअरस्टोचा 100 वा कसोटी सामना
वृत्तसंस्था/ धरमशाला
भारताची इंग्लंडविरुद्धची पाचवी कसोटी आज गुरुवारपासून सुरू होत असून भारताचा प्रमुख ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनसाठी ही कसोटी ऐतिहासिक आहे. कारण ही त्याची 100 वी कसोटी असून हा सामना अविस्मरणीय बनविण्याच्या दृष्टीने त्याचे लक्ष केंद्रीत झालेले असेल. मालिका जिंकलेल्या भारताला आता ही आघाडी 4-1 अशी वाढविण्याची त्यांना संधी असून तोचा त्यांचा निर्धार असेल. सकाळी 9.30 पासून सामन्याला प्रारंभ होईल.
रांचीमध्ये मालिका जिंकून भारताने मायदेशातील आपला विक्रम कायम ठेवला आणि आता जागतिक कसोटी स्पर्धेच्या क्रमवारीतील आपली आघाडी वाढवण्यासाठी ते आणखी एक अनुकूल निकाल नोंदवू पाहतील. खेळपट्टी आणि थंड हवामान, जे इंग्लिशला घरच्या वातावरणागत वाटत आहे, हे सध्या दोन मोठे चर्चेचे मुद्दे आहेत. आठवड्याच्या शेवटी वाढण्यापूर्वी आणखी दोन दिवस येथील कमाल तापमान 10 अंशांच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे.
सामन्याच्या पूर्वसंध्येला खेळपट्टी पाटा दिसत असली, तरी खाली ओलावा असल्याने वेगवान गोलंदाजांना सर्व दिवस खेळाच्या सुऊवातीच्या तासांमध्ये खेळपट्टीकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. इतिहास पाहता हे स्थान वेगवान गोलंदाजांना अनुकूल राहिलेले असले, तरी फिरकीपटूंच्या भूमिकेचे महत्त्व बाजूला केले जाऊ शकत नाही. 2017 मध्ये येथे खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर मिळविलेल्या विजयात त्यांनीच मोठी भूमिका बजावली होती. नुकत्याच येथे झालेल्या चार रणजी सामन्यांमध्ये संघांना अनेक वेळा 300 हून अधिक धावा करता आलेल्या असून त्यात बडोद्याने सर्वाधिक 482 धावा काढलेल्या आहेत.

अश्विन आणि जॉनी बेअरस्टो हे दोघेही गुऊवारी आपली 100 वी कसोटी खेळणार आहेत. त्यांनी खेळपट्टीवर विरोधाभासी मत व्यक्त केले आहे. बेअरस्टोला खेळपट्टी ‘छान’ वाटली आहे, तर अश्विनने दोन्ही संघ थंड हवामान लक्षात घेता अज्ञात स्थळी पाऊल ठेवतील, असे मत व्यक्त केले आहे. तथापि, दोन वेगवान गोलंदाज आणि तीन फिरकी गोलंदाजांच्या भारताच्या समीकरणात बदल हेण्याची शक्यता नाही.
जसप्रीत बुमराह वेगवान माऱ्याला बळ देण्यासाठी पुनरागमन करेल आणि मोहम्मद सिराज हा दुसरा वेगवान गोलंदाज राहील. अश्विन, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे फिरकी मारा सांभाळतील. केएल राहुल पूर्ण तंदुऊस्त न झाल्याने संघर्ष करणाऱ्या रजत पाटीदारला आणखी एक संधी मिळू शकते. त्याला आपल्या पदार्पणाच्या मालिकेत चौथ्या क्रमांकावर येऊन सहा डावांत केवळ 63 धावा करता आलेल्या आहेत. संघातील स्थान टिकवून ठेवण्याची ही त्याची शेवटची संधी असू शकते. देवदत्त पडिक्कल हा वरच्या फळीतील फलंदाज असला, तरी मधल्या फळीत खेळविण्याच्या दृष्टीने संघ व्यवस्थापनाकडे त्याच्या रुपाने दुसरा पर्याय आहे.
राजकोटमध्ये शानदार पदार्पण केल्यानंतर सर्फराज खानला रांचीमध्ये मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि कसोटीचा हंगाम संपण्यापूर्वी तो धरमशालामध्ये मोठी खेळी करण्यास उत्सुक असेल. उर्वरित फलंदाजांनी आपला ठसा उमटविलेला असून त्यात विशेषत: यशस्वी जैस्वाल हा एका मालिकेत 700 धावा करणारा महान सुनील गावसकर यांच्यानंतरचा दुसरा भारतीय फलंदाज बनण्याच्या अगदी जवळ पोहोचलेला आहे.
बाझबॉल काळातील पहिला मालिकापराभव
इंग्लंडने आधीच मालिका गमावली आहे. ‘बाझबॉल’ युगातील त्यांचा हा पहिला मालिका पराभव आहे. बेअरस्टोसाठी 100 वी कसोटी असल्याने हा सामना महत्त्वपूर्ण आहे. इंग्लंडचे क्रिकेटपटू सध्या या निसर्गरम्य शहरातील थंड हवामानाचा आनंद घेत आहेत. बेअरस्टोची कामगिरी या मालिकेत खराब राहिली आहे आणि गमावलेला फॉर्म परत मिळवून 100 वी कसोटी अविस्मरणीय बनविण्याचे त्याचे लक्ष्य निश्चितच असेल. इंग्लंडचे चाहतेही मोठ्या संख्येने येथे दाखल झाले आहेत. दीर्घ दौऱ्याची समाप्ती जवळ पोहेचलेली असताना खेळाडूंना मायदेशी परतण्याचे वेध लागलेले आहेत का, असे विचारले असता बेन स्टोक्सने आपल्याला कोणीही असा विचार करत असल्याचे वाटत नाही, असे सांगितले.
संघ-भारत : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, के. एस. भरत, देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.
इंग्लंड : बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, शोएब बशीर, झॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टले, ऑली पोप, ज्यो रूट, मार्क वूड.
सामन्याची वेळ : सकाळी 9.30 वा.









