मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यासाठी पाचारण करण्यात आलेल्या भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्स या एजन्सीजने एकूण 23,000 नागरिकांची सुटका केली आहे. या नागरिकांची सुटका करून त्यांना लष्कराच्या तळावर सुरक्षित हलवले असल्याचे भारतीय लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, लष्कराने बचाव कार्य सुरू केल्यापासून हिंसाचाराची कोणतीही घटना घडलेली नाही. त्यामुळे कर्फ्यूची वेळ सकाळी 7 ते सकाळी 10 पर्यंत शिथिल करण्यात आली आहे.
लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे की, “मणिपूरमधील सर्व समुदायातील नागरिकांची सुटका करण्यासाठी, हिंसाचाराला आळा घालण्यासाठी आणि सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी गेल्या 96 तासांपासून अथक प्रयत्न सुरू आहेत. आर्मी आणि आसाम रायफल्सच्या 120 ते 125 तुकड्यांमुळे हे शक्य झाले आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा झाली नसल्याने चुरचंदपूरमध्ये आज सकाळी ७- १० वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. त्यानंतर लगेचच सुरक्षा दलांनी फ्लॅग मार्च काढला.” असी माहीती सांगण्यात आली.
गेल्या २४ तासांत, मणिपूरमध्ये लष्कराने हवाई मार्गांचा वापर करून पाळत ठेवण्यामध्ये लक्षणीय वाढ केली आहे. इंफाळ खोऱ्यात मानवरहित हवाई वाहने (यूएव्ही) तसेच लष्कराच्या हेलिकॉप्टरमध्येही वाढ झाली असल्याचे एएनआयने वृत्त दिले आहे.









