अफगाणिस्तानच्या प्रतिष्ठित इस्लामी विचारवंताने पाकला दाखविला आरसा
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावावर अफगाणिस्तानचे प्रसिद्ध इस्लामिक विद्वान शेख अब्दुल समी गजनवी यांनी वक्तव्य केले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षाला जिहादशी जोडले जाऊ नये. अशा लढाईला कुठल्याही प्रकारे जिहाद मानता येणार नाही, कारण याचा इस्लाम धर्माशी कुठलाच संबंध नाही असे गजनवी यांनी स्पष्ट केले आहे.
भारतासोबतच्या संघर्षाला पाकिस्तानने धर्माची लढाई किंवा जिहाद असल्याचे भासविण्याचा प्रयत्न सुरू केला होता. खासकरून काश्मीरबद्दल बोलताना शाहबाज शरीफ, असीम मुनीर आणि इतर पाकिस्तानी नेत्यांकडून मुजाहिदीन आणि जिहाद यासारख्या शब्दांचा वापर करण्यात येत आहे.
जिहादसाठी इस्लामिक नियम आणि उद्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. जर कुठल्याही संघर्षात असे होत नसेल तर त्याला जिहादशी जोडले जाऊ नये. पाकिस्तान आणि भारत या अण्वस्त्रसज्ज देशांमधील संघर्ष हा स्पष्टपणे राजनयिक आणि राष्ट्रीय कारणामुळे आहे, त्यामागे धार्मिक कारण नाही असे गजनवी यांनी म्हटले आहे.
शेख गजनवी हे केवळ अफगाणिस्तान नव्हे तर पूर्ण क्षेत्रात इस्लामिक शिक्षणाच्या क्षेत्रात मोठे नाव आहे. सोव्हियत महासंघ आणि अमेरिकेच्या अफगाणिस्तानवरील आक्रमणादरम्यानही ते अत्यंत सक्रीय राहिले. शेख गजनवी यांना अफगाणिस्तानात मोठा सन्मान प्राप्त आहे.









