प्रत्येक महिन्याला वाढ : अरिअर्सच्या नावाखाली दंड
प्रतिनिधी/ बेळगाव
प्रत्येक महिन्याला वाढते विजेचे बिल भरणे नागरिकांना डोईजड होत आहे. वर्षभरापूर्वी येणाऱ्या बिलापेक्षा दुप्पट बिल भरावे लागत असल्याने आर्थिक ताळमेळ कसा बसवायचा? हा प्रश्न नागरिकांसमोर आहे. त्यातच एप्रिलपासून पुन्हा दरवाढ होणार असल्याने बिलात आणखी वाढ होणार आहे.
प्रत्येक घराला त्याच्या वापराप्रमाणे एक किलो वॅटपासून पुढे विद्युतपुरवठा दिला जातो. परंतु बऱ्याचवेळा मंजूर केलेल्या किलोवॅटपेक्षा अधिक वीज वापरली असल्याने हेस्कॉमकडून दंड लावला जातो. त्याचबरोबर मागील अरिअर्स मिळून वीजबिलाची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. 500 ते 600 रुपये प्रतिमहिना येणारे विद्युतबिल आता 700 ते 800 वर पोहोचल्याने ते भरेपर्यंत नागरिकांच्या नाकीनऊ येत आहेत.
विद्युत बिल यापूर्वी इंग्रजीमध्ये येत असल्याने बिलाचे वाचन करणे सर्वसामान्यांना सोयीचे होते. परंतु मागील वर्षभरापासून विद्युतबिल कन्नड भाषेमध्ये दिले जात असल्याने. त्यामध्ये कोणता दंड घालण्यात आला आहे, याची माहिती ग्राहकांना मिळत नाही. त्यामुळे हेस्कॉम कार्यालय गाठून वाढीव बिलाची व दंडाची चौकशी करावी लागते. त्यामुळे विद्युतबिल कन्नडसोबत इंग्रजीमध्येही द्यावे, अशी मागणी मराठी भाषिकांमधून केली जात आहे.
हेस्कॉमकडे तक्रार करण्याची गरज
वापरापेक्षा अधिक विद्युतबिल येत असेल तर ग्राहकांनी हेस्कॉमकडे तक्रार करणे गरजेचे आहे. प्रत्येक उपविभागीय कार्यालयात जाऊन मिटर टेस्टींगसाठी अर्ज द्यावा त्यानंतर ग्राहकासमोर मीटर टेस्टींग केले जाते. यावेळी कोणतीही तफावत आढळल्यास मीटरची दुरुस्ती केली जाते. बऱ्याचवेळा जुन्या मीटरमुळे बिलमध्ये वाढ होण्याची शक्यता असते.









