वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2028 साली होणाऱ्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिक स्पर्धेत टी-20 क्रिकेटचा पहिल्यांदाच समावेश करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारिणी समितीमध्ये शुक्रवारी लॉस एंजिल्स ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यास अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.
2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद लॉस एंजिल्स भूषविणार आहे. दरम्यान या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये टी-20 या क्रिकेट प्रकाराचा समावेश करण्याचा प्रस्ताव स्पर्धा आयोजकांनी ठेवला होता. दरम्यान मुंबईत झालेल्या आयओसीच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये या नव्या क्रीडा प्रकाराचा समावेश करण्यास अधिकृत मान्यता देण्यात आल्याची माहिती आयओसीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांनी दिली आहे.
2028 च्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये यापूर्वी पाच नव्या क्रीडा प्रकारांचा समावेश करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता आणि त्यामध्ये क्रिकेट, बेसबॉल, सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, स्क्वॅश आणि लॅक्रोसी यांचा समावेश होता. तब्बल 128 वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होणार आहे. यापूर्वी म्हणजे 1900 पॅरीस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता.
लॉस एंजिल्स ऑलिम्पिक स्पर्धा आयोजक प्रमुखांनी 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष आणि महिलांसाठी टी-20 क्रिकेट स्पर्धा घेण्याचा प्रस्ताव मांडला होता. तसेच त्यांनी पुरुष आणि महिलांच्या दोन्ही विभागात प्रत्येकी 6 संघांचा समावेश करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला होता. लॉस एंजिल्स ऑलिम्पिकचे यजमानपद अमेरिका भूषवित असल्याने त्यांचे दोन्ही संघ टी-20 क्रिकेट प्रकारात सहभागी होण्यास प्रस्ताव ठेवण्यात आला होता. 1900 साली झालेल्या पॅरीस ऑलिम्पिकमध्ये ब्रिटनने यजमान फ्रान्सचा पराभव करून क्रिकेटचे सुवर्णपदक पटकावले होते.









