बंगालमधील सभेत ममता सरकारवर थेट शरसंधान
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या संदेशखालीत झालेल्या महिलांच्या लैंगिक शोषणामुळे देशभरात संताप निर्माण झाला आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संदेशखालीचा मुद्दा उपस्थित करत पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सरकारवर बुधवारी जोरदार निशाणा साधला आहे. मोदींनी बंगालच्या बारासात येथे एका जाहीर सभेला संबोधित केले आहे. संदेशखालीत जे घडले, त्यामुळे देशाची मान शरमेने झुकली आहे. तर तृणमूल काँग्रेस सरकार बंगालच्या महिलांच्या गुन्हेगाराला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मोदींनी केला आहे.
विरोधी पक्षांचे नेते माझा परिवार कुठे आहे हे जाणून घेऊ इच्छितात. या घोर घराणेशाहीवाद्यांनी या सभेसाठी जमलेल्या समुदायावर एक नजर टाकावी. हा जनसमुदायच मोदीचा परिवार आहे. मोदीचा प्रत्येक क्षण याच परिवार आणि देशाच्या मातृशक्तीसाठी समर्पित आहे. जेव्हा मोदीसमोर अवघड प्रसंग येतो, तेव्हा याच माताभगिनी रक्षाकवच होऊन समोर उभ्या ठाकतात. आज प्रत्येक देशवासीय स्वत:ला मोदीचा परिवार म्हणत आहे. आज देशातील प्रत्येक गरीब, प्रत्येक शेतकरी, भगिनी, मुलगी मी मोदीचा परिवार असल्याचे म्हणत असल्याचा दावा मोदींनी केला आहे.
गरीब, दलित, आदिवासी परिवारांच्या माताभगिनींसोबत तृणमूलचे नेते ठिकठिकाणी अत्याचार करत आहेत, तर तृणमूल काँग्रेस सरकार स्वत:च्या अत्याचारी नेत्यावर विश्वास दाखवत आहे, तृणमूल काँग्रेसला बंगालच्या माताभगिनींवर विश्वास नाही. अशाप्रकारच्या वागणुकीमुळे बंगालच्या महिला, देशाच्या महिला आक्रोशात आहे. नारीशक्तीचा हा आक्रोश केवळ संदेशखालीपर्यंतच मर्यादित राहणार नाही. तुष्टीकरण आणि खंडणीखोरांच्या दबावाखाली काम करणारे तृणमूल सरकार कधीच माताभगिनींना सुरक्षा देऊ शकत नाही. तर दुसरीकडे केंद्रातील भाजप सरकारने बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाची तरतूद केली आहे. संकटाच्या काळात भगिनींसाठी महिला हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे, परंतु तृणमूल सरकार ही व्यवस्था पश्चिम बंगालमध्ये लागू करण्यापासून रोखत असल्याची टीका मोदींनी केली आहे.
भारताची नारीशक्ती विकसित भारताचा एक सशक्त स्तंभ आहे. भारताच्या नारीशक्तीची आर्थिक शक्ती वाढावी म्हणून मागील 10 वर्षांमध्ये भाजप सरकारने सातत्याने काम केले आहे. परंतु बंगालला तृणमूल काँग्रेस नावाचे ग्रहण लागले आहे. तृणमूल काँग्रेस राज्याला विकासापासून रोखत असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला आहे.
अबकी बार एनडीए सरकार 400 पार
मागील 10 वर्षांमध्ये भाजपने बंगाल आणि देशाच्या विकासासाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. हेच काम पाहून पूर्ण देश आता अबकी बार एनडीए सरकार 400 पार असा नारा देत असल्याचे उद्गार मोदींनी सभेत काढले आहेत. केंद्र सरकारमध्ये रालोआ परतणार हे कळून चुकल्याने इंडिया आघाडीतील सर्व नेते बिथरले आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.
संदेशखालीच्या पीडितांची घेतली भेट
पंतप्रधानांनी बुधवारी संदेशखालीतील पीडित महिलांची भेट घेतली आहे. यादरम्यान पीडित महिलांनी पंतप्रधानांना स्वत:वर ओढवलेल्या संकटाची माहिती दिली. पीडित महिला पंतप्रधान मोदींसमोर स्वत:ची आपबीती मांडताना भावुक झाल्या. तर एका पित्याप्रमाणे पंतप्रधान मोदींनी पीडित महिलांचे दु:ख जाणून घेतले आहे. पीडित महिलांसोबत अन्याय होऊ देणार नाही, मी तुमच्यासोबत आहे असे पंतप्रधान मोदींनी त्यांना उद्देशून म्हटले आहे. संदेशखालीच्या अनेक महिलांनी शाहजहां शेखसमवेत अनेक तृणमूल नेत्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. तृणमूल नेत्यांच्या लैंगिक शोषणाला संदेशखालीतील अनेक महिला बळी पडल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.









