ऑनलाईन टीम / तरुण भारत :
नव्या संसद भवनाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. त्यानंतर देशातील 21 विरोधीपक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत खंत व्यक्त केली.
राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आज देशाच्या नवीन संसदभवनाचं लोकार्पण झालं. संसदभवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ, त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे. ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं. असो, ह्या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं प्रतीक आहे ती लोकशाही टिकवण्यासाठी आजपर्यंत झटलेल्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन. भारतीय लोकशाही चिरायू होवो.” असे ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे.
नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. ही मागणी भाजपने मान्य केली नाही. त्यामुळे देशभरातील 21 विरोधी पक्षांनी या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. अखेर आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते नव्या संसदेचे उद्घाटन करण्यात आले.