प्रशासकीय यंत्रणेवर वाढतोय ताण
बेळगाव : उत्साही वातावरणात बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची शनिवार दि. 6 रोजी सायंकाळी 6 वाजता सुरू झालेली श्री विसर्जन मिरवणूक रविवार दि. 7 रोजी रात्री उशिरापर्यंत 24 तासांहून अधिककाळ सुरूच होती. रविवारी रात्री 8 पर्यंत कपिलेश्वर नवीन तलावात 132 श्री मूर्ती, जुन्या कपिलेश्वर तलावात 50 श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. तर जक्कीन होंड तलावात 50 श्री मूर्तींचे विसर्जन झाले. शहरातील वाढलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या व काही मंडळांनी विसर्जन मिरवणूक उशिरा सुरू केल्याने विसर्जनावर याचा परिणाम झाला. शनिवारी दुपारी 4 वाजता माळी गल्ली येथील सार्वजिनक गणेश मूर्तीचे सर्वप्रथम नवीन कपिलेश्वर तलावात विसर्जन करण्यात आले.
सायंकाळी 6 वाजता हुतात्मा चौकातून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यानंतर शहर व उपनगरांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊ लागले. हुतात्मा चौक ते कपिलेश्वर तलाव मार्गावर निघालेल्या या मिरवणुकीत हजारो गणेश भक्तांची सहभाग घेत रात्र जागविली. मिरवणुकीत तरुण व महिलांचा सहभाग लक्षणीय होता. यंदा शहर व उपनगरांतील सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींच्या संख्या वाढल्याने मिरवणूक लांबल्याचे दिसून आले. मुख्य मिरवणुकीत 250 हून अधिक मंडळांच्या मूर्ती सहभागी झाल्या. मिरवणूक पाहण्यासाठी शनिवारी रात्री 9 नंतर धर्मवीर संभाजी चौकात गणेश भक्तांची मोठी गर्दी केली होती.
रविवारी पहाटेच्यादरम्यान पोलिसांनी डिजे बंद करण्याची सूचना केली. यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक पुढे सरकत होती. कपिलेश्वरजवळील कपिलतीर्थ व कपिलेश्वर तलावात मूर्ती विसर्जन करण्यात येत होत्या. जुन्या कपिलेश्वर तलावावर महापालिकेकडून चार व्रेन तर नवीन तलावावर पाच क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. पण प्रत्येक मूर्ती विसर्जन करण्यास वेळ लागत होता. त्याचा परिणामही मिरवणुकीवर झाला. विसर्जन तलावरही गणेश भक्तांनी गर्दी केली होती. दरवर्षी मिरवणुकीत श्री मूर्तींची संख्या वाढत असल्याने मिरवणूक संपायला दुसऱ्या दिवशीची रात्रही उलटत आहे. याचा प्रत्यय रविवारच्या मिरवणुकीतही दिसून आला. मिरवणूक वेळेत संपण्यासाठी मध्यवर्ती सार्वजनिक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात येत होते. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी गणेश विसर्जन करण्यासाठी गणेश मंडळांची चढाओढ विसर्जन मिरवणूक लांबण्यास कारणीभूत ठरत आहे.
बहुतांश मंडळे श्रीमूर्ती विसर्जनासाठी बाहेर काढताना उशीर करीत आहेत. प्रशासनाकडून वारंवार सूचना करूनदेखील मंडळांवर याचा कोणताच परिणाम होताना दिसत नाही. गतवर्षी विसर्जन मिरवणूक संपण्यास 30 तास लागले होते. मात्र यंदा 24 तास उलटले तरीही विसर्जन मिरवणूक सुरूच होती. पश्चिमेकडील खडक गल्ली, चव्हाट गल्लीसह काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती तलावाकडे येत होत्या. तर दक्षिणेकडील अनगोळ, वडगाव, शहापूर भागातील श्री मूर्तीही बँक ऑफ इंडियापर्यंत थांबून होत्या. रात्री उशिरापर्यंत श्री मूर्तींचे विसर्जन सुरू होते.
विसर्जन मिरवणूक दरवर्षी लांबत चालण्याने याचा ताण प्रशासकीय यंत्रणेवर पडत आहे. यंदाची विसर्जन मिरवणूक 30 तासांहून अधिककाळ चालेल, असा अंदाज मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांतून व्यक्त करण्यात येत होता. शहर व उपनगरांत 370 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. यापैकी बहुतांश मंडळे श्रीमूर्ती विसर्जन करण्यासाठी कपिलेश्वर तलावाकडे येतात. विसर्जन मिरवणूक लवकर पूर्ण व्हायची असल्यास दक्षिण व उत्तर भागासाठी दोन नवीन सुसज्ज तलाव महापालिकेने निर्माण करण्याची गरज असल्याचेही गणेश भक्तांतून बोलले जात आहे.









