डिचोली नगरपालिकेच्या मार्केट इमारतीत केले होते सुरू. नगरपालिकेने दिला होता तात्पुरता परवाना. अबकारी खात्याच्या मागील परवान्यावरच सुरू केले होते दुकान
डिचोली : डिचोली बजारातील छत्रपती शिवाजी महाराज संकुल या डिचोली नगरपालिकेच्या मार्केट प्रकल्पात माजी उपनगराध्यक्षांनी सुरू केलेल्या बेकायदेशीर दारू विक्री दुकानावर धडक कारवाई करताना डिचोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन देसाई यांनी बंद केले. या प्रकाराबाबत स्थानिक नगरसेविका अँड. अपर्णा फोगेरी यांनी मुख्याधिक्रायांकडे तक्रार केली होती. तसेच माजी उपनगराध्यक्ष भगवान हरमलकर व युवानेते कुंदन फोगेरी यांनीही मुख्यधिक्रायांची भेट घेऊन हे प्रकरण लक्षात आणून दिले होते. या मार्केट संकुलात कोणत्याही प्रकारच्या दारूची विक्री वर्ज्य असल्याची अट दुकानांच्या करारपत्रात नमूद करण्यात आली असतानाही या संकुलात अशा प्रकारचे दुकान कसे सुरू होऊ शकते ? ते त्वरित बंद करण्याची मागणी नगरसेविका अँड. अपर्णा फोगेरी यांनी मुख्याधिक्रायांकडे केली. या दुकानाला परवाना आहे का ? याची शाहनिशा केली असता नगरपालिकेतर्फे त्याला तात्पुरता परवाना दिल्याचे समजले. यावर नगरसेविका अँड. अपर्णा फोगेरी यांनी तीव्र आक्षेप घेतला.
उपनगराध्यक्ष अजित बीर्जे यांना सध्या गाळ्यांचे पुनर्वसन झाल्यानंतर मिळालेल्या गाळ्याचे प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे. सदर गाळा हा बेकायदेशीरपणे स्व. कांता च्यारी यांच्या नावावरून माजी उपनगराध्यक्ष बीर्जे यांनी आपल्या नावावर केल्याचा दावा करत कांता च्यारी यांचे पूत्र यशवंत, कन्या तन्वी व तनुजा यांनी उच्च न्यायालयात खटला सादर केला आहे. सदर खटला न्यायालयाने स्विकारला असून तो चालणार आहे. वास्तविक नगरपालिकेचे गाळे रक्ताच्या नात्यातील व्यक्तीशिवाय इतरांच्या नावावर होऊ शकत नाही, तरीही हा गाळा च्यारी यांच्या नावावरून बीर्जे यांच्या नावावर कसा झाला ? याविषयी खटला सुरू आहे.
उपलब्ध माहितीनुसार, अजित बीर्जे यांनी या गाळ्यात हल्लीच एक घाऊक विक्री दारूचे दुकान सुरू केले होते. नगरपालिका संकुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे. या संकुलात कोणत्याही प्रकारच्या दारूची विक्री करू शकत नाही. तरीही बीर्जे यांनी सदर दुकानात दारू विक्री सुरू केली. या संबंधी स्थानिक नगरसेविका अँड. अपर्णा फोगेरी यांनी सर्वप्रथम पालिका मुख्याधिक्रायांकडे तक्रार केली. व सदर दुकान बंद करण्याची जोरदार मागणी केली. त्यानंतर माजी उपनगराध्यक्ष भगवान हरमलकर व डिचोलीतील युवानेते कुंदन फोगेरी यांनी मुख्याधिक्रायांची भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली. त्यामुळे मुख्याधिकारी सचिन देसाई यांनी धडक कारवाई करताना सदर दुकान बंद करण्याचे.आदेश दिले.
अजित बीर्जे यांनी यापूर्वी सदर गाळे मासळी मार्केटजवळ असताना आपल्या गाळ्यात घाऊक दारू विक्रीचा परवाना अबकारी खात्याकडून मिळवला होता. त्यानंतर सदर मार्केट संकुल तयार झाला आणि या सर्व पत्र्यांच्या दुकानांमधील गाळेधारकांना नवीन इमारतीत हलविण्यात आले. या इमारतीत आल्यानंतर बीर्जे यांनी आपल्या जुन्याच परवान्याच्या आधारे दारू विक्री दुकान सुरू केले. वास्तविक अबकारी खात्याच्या कायद्यानुसार दुकानाची जागा बदलल्यास सर्व प्रक्रिया व सर्व्हे नवीन करावा लागतो. जुन्या परवान्यानिशी दुकान सुरू करता येत नाही. सध्याच्या मार्केट संकुलापासून बाजारातील लोकांचे श्रध्दास्थान असलेल्या देव श्री. कोटेश्वराचे मंदिर अवघ्याच अंतरावर आहे. त्यामुळे अबकारी खात्याच्या नियमानुसार सदर संकुलात दारू विक्रीचा परवाना मिळूच शकत नाही. तरीही सदर दुकान सुरू करण्याचे धाडस बीर्जे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आम्ही सर्वजण मिरवत आहे. या थोर महाराजांचे नाव देण्यात आलेल्या या मार्केट संकुलात अशा प्रकारचे प्रकार घडणे गैर आहे. हे प्रकार असमर्थनिय आहे. अशा प्रकारांना यापुढेही विरोध करणार, अशी प्रतिक्रिया भगवान हरमलकर यांनी व्यक्त केली. खुद्द नगरपालिकेच्या करारपत्रात असलेला नियम एका माजी उपनगराध्यक्षपद भुषविलेल्या व्यक्तीने तोडणे अत्यंत दुर्दैवी आहे. परंतु मुख्यधिकारी सचिन देसाई यांनी जलद कृती करून सदर दुकान तत्काळ बंद करण्याची केलेली कारवाई उल्लेखनीय आहे. असे कुंदन फोगेरी यांनी म्हटले.









