प्रथमच पेटले विजेचे दिवे : धनगर कुटुंबियांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य : आमदार जीत आरोलकर यांच्याकडून चतुर्थी भेट
पेडणे : तुये पठारावरील धनगर कुटुंबियांची घरे गेल्या अनेक वर्षांपासून काळोखाचा समाना करत होते. गोवा मुक्तीनंतरही आमदार, मंत्र्यांना ही घरे प्रकाशमान करण्यात अपयश आले होते. परंतु मांद्रे मतदारसंघाचे विद्यमान आमदार जीत आरोलकर यांनी विशेष प्रयत्न करून संबंधित धनगर बांधवांच्या वस्तीपर्यंत वीज सुविधा पोहोचवून त्यांच्या झोपड्या प्रकाशमान केल्या. रविवारी 10 रोजी आमदार आरोलकर यांच्या हस्ते स्वीच दाबून वीज सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, आमदार आरोलकर यांनी वीजवाहिनी जाणाऱ्या मार्गावरील जमीन मालकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी वीज खांब घालण्याविषयी चर्चा केली. संबंधित जमीन मालकांची परवानगी घेऊन वीज खात्यांतर्गत बाबू शिंदे, वाघू वरक व छाया घुरे यांच्या झोपड्यामध्ये विजेची सोय केली. आपल्या झोपड्यांमध्ये लख्ख प्रकाश पडलेला पाहून हे पाहून तेथील धनगर समाजातील कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. या कुटुंबीयांनी आमदार जीत आरोलकर यांना भरभरून आशीर्वाद दिले. आम्ही तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. गोवामुक्तीनंतर सुमारे सत्तर वर्षांनंतर आमची कुणीच दखल घेतली नव्हती. आता आम्हाला कायमस्वरूपी विजेची सोय करून दिल्याबद्दल शतश: त्यांचे आभार मानले. उद्घाटन प्रसंगी आमदार जीत आरोलकर, तुयेचे माजी पंच सदस्य आनंद साळगावकर, पंच सदस्य अनुपमा साळगावकर, पंच सदस्य स्वीटी नाईक, धारगळ जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर, पालये पंच सदस्य सागर तिळवे, दयानंद मांद्रेकर, मुकेश सावंत, विनेश रेडकर, पेडणे वीज कार्यातलयाचे सहाय्यक अभियंता वाठू सावंत आदीसह नागरिक उपस्थित होते.
धनगर बांधवांना भविष्यात पक्की घरेही बांधून देणार : आरोलकर
धनगर समाजातील तीन कुटुंब या परिसरात अनेक वर्षांपासून वास्तव्य करून आहेत. त्यांच्या झोपड्यामध्ये विजेची सोय नव्हती. वीज नसतानाही या घरातील कुटुंब आपली दैनंदिन कामे करत असत. शाळेत शिकणाऱ्या मुलांना रात्रीच्यावेळी पेट्रोलचे दिवे, मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करावा लागत होता. हे दृष्य पाहून खंत वाटली. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत धनगर बांधवांच्या झोपड्यांमध्ये विजेची सोय केली आह. ज्यांच्या घरातच सत्तर वर्षे विजेची सोय नाही. परंतु, सर्वसामान्य नागरिकांच्या घरात वीज असताना जर एखाद्यावेळी ती गायब झाली, तर लगेच फोन येतात, तक्रारी येतात. परंतु, या कुटुंबियांनी विजेअभावी हालअपेष्टा कशा काढल्या? असा सवाल आमदार जीत आरोलकर यांनी उपस्थित केला. अशी कामे करताना नागरिक आणि जनतेचाही पंचायत मंडळांचाही वेळोवेळी पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. भविष्यात यांना पक्की घरेही बांधून देण्याचा मनोदय आमदार जीत आरोलकर यांनी व्यक्त केला. वीजपुरवठा करण्यासाठी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे सहकार्य मिळाल्याचे सांगून आमदार आरोलकर यांनी त्यांचे आभार मानले.
आजही अनेक घरे विजेविना : मनोहर धारगळकर
भारत देश चंद्रावर प्रकाश करण्यासाठी पाऊल टाकत आहे. स्वातंत्र्याला 75 वर्षे उलटूनही अशी अशी अनेक कुटुंबे आजही विजेविना जीवन कंठित आहेत. हे आमचे दुर्दैव आहे, अशी खंत जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर व्यक्त केली. यापुढे तरी अशा वंचित कुटुंबीयावर विजेविना जगण्याची वेळ येऊ नये, असे मनोहर धारगाळकर म्हणाले. आनंद साळगावकर यांनी संबंधित धनगर बांधवांच्या घर वजा झोपडीत सोय व्हावी. यासाठी वेगळ्या प्रकारचे ठराव पंचायतीने घेऊन आमदारांच्या प्रयत्नातून त्यांच्या झोपड्या प्रकाशमान केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पालयेचे पंच सदस्य सागर तिळवे यांनी मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांचे अभिनंदन केली. विजेची समस्या सोडवण्यासाठी मांद्रे येथे वीज उपकेंद्र उभारले आहे. ते चतुर्थीपूर्वी कार्यान्वित होणार असल्याचे सांगितले.









