कोल्हापूर :
बुझवडे (ता.चंदगड) येथे एक वर्षापूर्वी शिकार केलेल्या बिबट्याचे कातडे विकणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणने दोन दिवसांपूर्वी जेरबंद केले होते. बिबट्याची गोळी घालून शिकार करणाऱ्या बयाजी रामू वरक (वय 45, रा. बुजवडे) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. ठासणीच्या बंदुकीने बिबट्याला गोळी घातल्याची माहिती चौकशीतून समोर आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बिबट्याचे कातडे विकण्यासाठी आलेले धाकलू बाळू शिंदे (65, रा. हेरे, ता. चंदगड) आणि बाबू सखाराम डोईफोडे (57, रा. बांदराई धनगरवाडा, तिलारीनगर, ता. चंदगड) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपोवन मैदानात सापळा लावून पकडले होते. त्यांच्या चौकशीतून बिबट्याची शिकार करणारा बयाजी वरक याचे नाव समोर आले. त्याला पोलिसांनी अटक केली. एक वर्षांपूर्वी बुझवडे येथे शेतात ठासणीच्या बंदुकीने बिबट्याची शिकार केल्याची कबुली त्याने दिली. रविवारी त्याला सोबत घेऊन पोलिसांनी बुझवडे परिसरात बंदुकीचा शोध घेतला. मात्र, अद्याप बंदुकीचा शोध लागलेला नाही.
- 15 हजारांत नख्याची विक्री
वन्य प्राण्यांचे अवयव खरेदी करणे कायद्याने गुन्हा आहे. अटकेतील संशयितांनी 15 हजारांत बिबट्याच्या नख्यांची विक्री केली आहे. नख्या कोणी घेतल्या याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुह्यात त्यांनाही सह आरोपी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.








