प्रतिनिधी
बांदा
मडुरा रेल्वे स्थानकावर गणपती स्पेशल गाड्यांना थांबा देण्याचे स्पष्ट संकेत कोरे प्रशासनाने दिले आहेत. तसे पत्र को. रेचे रत्नागिरी विभागीय व्यवस्थापक रविंद्र कांबळे यांनी दिले आहे. तसेच कोकणकन्या एक्सप्रेसला थांबा व तुतारी एक्सप्रेस मडुरा स्टेशनवरुन सोडण्यासाठी को.रेकडे प्रशासन पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी उपोषणकर्त्यांना दिले. त्यानंतर उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आल्याचे रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी जाहीर केले. कोरेच्या गणपती स्पेशल गाड्यांच्या वेळापत्रकात तसे प्रसिद्ध न झाल्यास ३० ऑगष्ट नंतर थेट रेल रोको आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
कोकण रेल्वे मार्गावरील महाराष्ट्रातील शेवटचे स्थानक असलेल्या मडुरा स्टेशनवर केवळ दिवा एक्सप्रेसला थांबा आहे. कोकणकन्या एक्सप्रेसला थांबा मिळावा. तसेच तुतारी एक्सप्रेस मडुरा स्टेशनवरुन सोडावी अशी मागणी दशक्रोशीतील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यासाठी वारंवार आंदोलने, उपोषणे करण्यात आली. मात्र, आश्वासना व्यतिरिक्त कोरेने कोणतीही कार्यवाही केली नाही.
आठ दिवसांपूर्वी सुरेश गावडे यांनी रेल्वे थांब्यासाठी १५ ऑगष्ट रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. सावंतवाडी तहसीलदारांच्या मध्यस्तीने काल झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने आज दशक्रोशीतील ग्रामस्थांनी सावंतवाडी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दुपारी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. आरआरएम कांबळे यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेत गणपती स्पेशल गाड्यांना थांबा देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मळगाव सरपंच स्नेहल जामदार, कास सरपंच प्रविण पंडीत, किनळे सरपंच दीपक नाईक, कवठणी सरपंच अजित कवठणकर, कोनशी सरपंच साधना शेट्ये, तळवणे सरपंच गोविंद केरकर, माजी उपसभापती संदिप नेमळेकर, रोणापाल उपसरपंच कृष्णा परब, मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, मडुरा सोसायटी चेअरमन ज्ञानेश परब, संचालक दत्ताराम परब, कृष्णा गवस, सुभाष सावंत, मोहन गवस, प्रविण चौकेकर, अरुण परब, संभाजी परब, प्रमोद पंडीत, प्रविण नाईक, बाबलो राऊळ, उल्हास वालावलकर, सदाशिव गाड, जगन्नाथ पंडीत, पिंटो परब, शंकर कामुलकर, उदय राणे, संकेत सावंत, सिताराम गवस, संजय गावडे, केशव परब, संतोष जाधव, प्रकाश वालावलकर, भगवान परब आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









