बावळाट येथील घटनेत सुदैवाने लोखंडी छप्परामुळे घर वाचले
ओटवणे प्रतिनिधी
शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घराची पडवी भस्मसात झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री नंतर बावळाट कदमवाडी येथे घडली. सुदैवाने घराचे उर्वरित छप्पर लोखंडी असल्यामुळे पुढील अनर्थ टळला अन्यथा संपूर्ण घर या आगीत बेचिराख झाले असते. मात्र या घटनेत विजय गणपत कदम यांचे सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
शनिवारी रात्री कदम कुटुंबीय झोपी गेल्यानंतर मध्यरात्री अडीचच्या सुमारास विजय कदम यांना बाहेर सुरू असलेला पेटत्या आगीचा फटफट असा मोठा आवाज आला. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या कदम कुटुंबीयांनी बाहेर येऊन पाहताच तर त्यांना घराच्या लांबलचक पडवीने पेट घेतल्याचे दिसले. यावेळी त्यांनी आरडाओरड केल्यानंतर गणेश कदम, विनीत कदम, विवेक कदम, सुरेश कदम, मोहन जाधव, अशोक कदम, गुंडू कदम आदी ग्रामस्थांनी धाव घेत ही आग विझवण्यास सुरुवात केली. मात्र तोपर्यंत घराची पडवी या अग्नी प्रलयात भस्मसात झाली.
या घराच्या फक्त पडवीचे छप्पर लाकडी होते उर्वरित संपूर्ण घराचे छप्पर लोखंडी होते. या आगीमध्ये घराची पडवी बेचिराख झाली होती मात्र पडवीवरील छप्पर लोखंडी असल्यामुळेच या छप्पराने पेट घेतला नाही. अन्यथा हे संपूर्ण घरच या अग्नी प्रलयात बेचिराख झाले असते. मात्र या घटनेत घराच्या पडवीचे संपूर्ण छप्पर तसेच आतील सर्व वस्तू भस्मसात होऊन सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच रविवारी सकाळीच घटनास्थळी सातुळी बावळाट सरपंच सोनिया परब, पोलीस पाटील आबा परब, भालचंद्र नाईक आदी ग्रामस्थांनी भेट देत नुकसानीची पाहणी केली.









