गाझामधील भुयारांमध्ये झाली होती भेट : इस्रायलकडून अहद तमीमीची होणार सुटका
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायलसोबतच्या युद्धादरम्यान हमास प्रमुख याह्या सिनवारने गाझामधील एका भुयारात इस्रायली ओलिसांची भेट घेतली होती. याह्याने हिब्रू भाषेत सर्व ओलिसांना तुम्ही सर्व जण सुरक्षित जागी असून येथे घाबरण्याचे कुठलेच कारण नसल्याचे सांगितले होते. याह्याच्या भेटीदरम्यान उपस्थित एका ओलिसानी मुक्ततेनंतर इस्रायलच्या सैन्याला यासंबंधी माहिती दिली आहे.
तर इस्रायल आणि हमास यांच्यातील शस्त्रसंत्री 2 दिवसांसाठी वाढविण्यात आली आहे. ही शस्त्रसंधी आता बुधवारपर्यंत लागू असणार आहे. कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. याचदरम्यान हमासने सोमवारी रात्री उशिरा आणखी 11 इस्रायली नागरिकांची मुक्तता केली असून यात 9 मुले आणि 2 महिलांचा समावेश आहे.
हमासने मंगळवारी मुक्तता करण्यात येणाऱ्या 4 ओलिसांची यादीही इस्रायलला सोपविली आहे. याच्या बदल्यात इस्रायलकडून ज्या कैद्यांची मुक्तता करण्यात येणार आहे, त्यात पॅलेस्टिनी कार्यकर्ती अहद तमीमी सामील आहे. हमासकडून सोमवारी मुक्तता करण्यात आलेल्या ओलिसांमध्ये 2 जुळ्या मुली सामील आहेत. 3 वर्षीय यूली आणि एम्माला तिची आई शैरन अलोनी कूनियासोबत मुक्त करण्यात आले आहे, परंतु या मुलींचे वडिल डेव्हिड हे अद्याप हमासच्या कैदेत आहेत.
69 ओलिसांची आतापर्यंत मुक्तता
इस्रायलने देखील देशाच्या विविध तुरुंगांमध्ये कैद 30 मुले आणि 3 महिलांसमवेत 33 पॅलेस्टिनींना सोडले आहे. अशाप्रकारे इस्रायलने आतापर्यंत 150 पॅलेस्टिनींची मुक्तता केली आहे. तर हमासने 69 ओलिसांना सोडले आहे. यात 53 इस्रायली ओलीस आणि 19 विदेशी नागरिक सामील आहेत.
अमेरिकेचे विदेशमंत्री दौऱ्यावर
अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन हे चालू आठवड्यात पुन्हा इस्रायलच्या दौऱ्यावर असणार आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून त्यांचा हा तिसरा इस्रायल दौरा आहे. बेल्जियममध्ये मंगळवारी आणि बुधवारी युक्रेनशी निगडित नाटोच्या बैठकांमध्ये भाग घेतल्यावर ब्लिंकेन इस्रायलमध्ये पोहोचतील. यादरम्यान ते वेस्ट बँकेलाही भेट देणार आहेत.
युद्ध लवकर संपावे : हमास
आम्ही हे युद्ध संपवू इच्छितो. शस्त्रसंधी करून आम्ही युद्ध लवकर संपवू शकू आणि पॅलेस्टिनी लोकांवर होत असलेले हल्ले रोखू शकू अशी अपेक्षा असल्याचे हमासचा नेता गाजी हमदने म्हटले आहे. शस्त्रसंधीच्या पुढील दोन दिवसांमध्ये हमासने 20 महिला आणि मुलांची मुक्तता करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी दिली आहे.









