इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांचा हमासला इशारा
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी बुधवारी हमासला इशारा दिला. हमासने शनिवार दुपारपर्यंत ओलिसांची मुक्तता न केल्यास शस्त्रसंधी संपुष्टात येईल असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे. नेतान्याहू यांनी स्वत:च्या सुरक्षा कॅबिनेटसोबत 4 तासांच्या बैठकीनंतर हे वक्तव्य केले आहे. परंतु नेतान्याहू यांनी सर्व ओलिसांच्या मुक्ततेबद्दल वक्तव्य केले आहे का शनिवारी मुक्तता होणाऱ्या केवळ 3 आलिसांची हे अद्याप स्पष्ट नाही.
हमास शस्त्रसंधीचे उल्लंघन करत ओलिसांची मुक्तता करण्यास नकार देत आहे. या पार्श्वभूमीवर आयडीएफला गाझाच्या आसपास सैनिकांची संख्या वाढविण्याचा आदेश दिला आहे. हमासने शनिवारपर्यंत ओलिसांची मुक्तता न केल्यास शस्त्रसंधी संपुष्टात येईल. आमचे सैन्य पुन्हा युद्ध सुरू करणार आणि हमासचा खात्मा होत नाही तोवर हे युद्ध चालेर असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे.
इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी सैन्याला अलर्ट राहण्याचा आणि गाझामध्ये कुठल्याही स्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचा आदेश दिला आहे. इस्रायलच्या सैन्याने गाझा डिव्हिजनच्या सैनिकांच्या सर्व सुट्या रद्द केल्या आहेत. तर यापूर्वी इस्रायल गाझाच्या दिशेने जाणारी मदत रोखून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असल्याचा दावा करत हमासने पुढील आदेशापर्यंत ओलिसांची मुक्तता रोखणार असल्याचे म्हटले हेते.
ट्रम्प यांची धमकी
शनिवारपर्यंत हमासने सर्व ओलिसांची मुक्तता न केल्यास गाझामध्ये सर्वकाही नष्ट होऊन जाईल अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व ओलिसांची मुक्तता न झाल्यास शस्त्रसंधी रद्द करण्यात यावी असे माझे मत आहे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.









