वृत्तसंस्था / भुवनेश्वर
साधारणत: 1 वर्ष वय असलेल्या तीन बालकांना यंदा पुरीच्या जगन्नाथ भगवानांची पूजा करण्याचा मान मिळणार आहे. बलदेब दासमोहपात्रा, एकांशू दासमोहपात्रा अशी यांपैकी दोघांची नावे आहेत. तिसऱ्या बालकाचे नाव अद्याप घोषित करण्यात आलेले नाही. या बालकांना प्रत्येकी 1 लाख ते 2 लाख रुपये मानधनही मिळणार असल्याचे देवस्थानाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बलदेव दासमोहपात्रा याचे वय 10 महिने, तर एकांशू दासमोहपात्रा याचे वय 12 महिने आहे. तिसऱ्याचे वयही 12 महिने आहे. मात्र, त्याचे नाव उघड करण्यात आलेले नाही. ही सर्व बालके दैतपती निजोग या श्रेणीतील असून या श्रेणीकडे परंपरेने भगवान जगन्नाथाची पूजा करण्याचा मान असतो.
या तिन्ही बालकांचा परिचय करुन देण्याचा कार्यक्रम देवस्थानाच्या एकांत कक्षात शुक्रवारी पार पडला. याच कक्षात भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या मूर्ती परंपरेनुसार 4 जूनपासून ठेवण्यात आल्या आहेत. या मूर्तींसमोर हा परिचय करुन देण्याचा कार्यक्रम प्रथेप्रमाणे करण्यात आला.
परंपरा कशी आहे?
विशिष्ट श्रेणीतील पुजाऱ्यांच्या घराण्यांमध्ये जेव्हा पुत्राचा जन्म होतो, तेव्हा त्या पुत्रालाही त्वरित देवाच्या पूजासेवेत समाविष्ट करुन घेण्यात येते. या श्रेणीतील घराण्यांना दैतापती अशी संज्ञा आहे. हा नवजात पुत्र भगवान जगन्नाथाच्या प्रसिद्ध रथयात्रेपूर्वी होणाऱ्या 15 दिवसांच्या पूजासेवा कार्यक्रमात कोणत्याही दिवशी पूजासेवेत समाविष्ट करुन घेतला जातो. त्याचा परिचय करुन देण्याचा कार्यक्रम मूर्ती ठेवलेल्या एकांत कक्षात करण्यात येतो. ही हजारो वर्षांची परंपरा आहे. ज्यावेळी अशा पुजाऱ्यांच्या घराण्यांमध्ये नवीन पुत्र जन्माला येतो, त्या प्रत्येक वेळी या प्रथेचे आचरण करण्यात येते, अशी माहिती देवस्थान व्यवस्थापनाने दिली आहे.