न्हावेली / वार्ताहर
निरवडे महापुरुष मित्रमंडळाकडून नवउद्योजकांचा सन्मान…
The honor of the house in the village is an inspiration for the future – Achyut Bhosale
निरवडे येथील महापुरुष मंडळाने नवउद्योजकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्यांचा केलेला सत्कार हा त्यांच्या आयुष्यातील वाटचालीला प्रेरणा देणारा ठरेल, असे मत भोसले नॉलेज सिटीचे अध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांनी येथे व्यक्त केले. दरम्यान घरचा सत्कार नेहमी चेतना देणार असतो, याचा आदर्श घेऊन उद्योजकांनी पुढील प्रवास यशस्वीरित्या करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. निरवडे येथील श्री देव भूतनाथ मंदिराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येथील महापुरुष कला-क्रीडा मंडळाच्या माध्यमातून सन्मान नवउद्योजकांचा हा अभिनव कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गावातील वीस हून अधिक नवउद्योजकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. भोसले बोलत होते.
यावेळी श्री. भोसले म्हणाले, आपण आयुष्यात खूप मोठे होतो. परंतू बऱ्याचदा आपला गावात सन्मान होत नाही. अनेकदा याचा प्रत्यय अनेकांना येतो. आयुष्यात आपल्या गावात सत्कार होणे महत्त्वाचे आहे. तो आयुष्याला प्रेरणा देतो. निरवडे येथील महापुरुष मित्र मंडळाने नवउद्योजकांचा केलेला सन्मान हा त्यांच्या कार्याला निश्चितच प्रेरणा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, ॲड. अनिल निरवडेकर, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा डिजिटल मीडिया संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, माजी सरपंच सदा गावडे, सरपंच सुहानी गावडे, दशरथ मल्हार, धर्माजी गावडे, संदीप पांढरे, संजू गावडे, मधुसूदन गावडे, विजय गावडे, भालचंद्र गोसावी, भगवान गावडे, नामदेव गावडे, शशिकांत माळकर, सूर्यकांत माळकर, नारायण माळकर, विलास पोपकर, विशाल पोपकर, चेतन माळकर, तुषार माळकर, प्रज्वल जोशी, आग्नेल डायस, नयनेश गावडे, दत्ताराम गावडे आदींसह गावातील ग्रामस्थ आणि महापुरुष कला क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. निरवडेकर म्हणाले, महापुरुष कला-क्रीडा मंडळाने आयोजित केलेला नवउद्योजकांचा सन्मान सोहळा हा नवउद्योजकांना प्रेरणा देणारा ठरला आहे. त्यामूळे आता गावातील या सत्कारमूर्ती नवउद्योजकांनीच पुढाकार घेऊन अजून गावात उद्योजक बनवावेत, असे आवाहन त्यांनी केले. तर या मंडळाने हा आयोजित केलेला कार्यक्रम स्तुत्य आहे. अशाच प्रकारचे यापुढे सुद्धा गावात कार्यक्रम होणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य मी निश्चितच करेन, असेही त्यांनी यावे सांगितले.
ते पुढे म्हणाले, आताच्या जगात शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे गावातील युवक-युवतींनी जास्तीत-जास्त शिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा, तरच आपण आत्ताच्या स्पर्धात्मक जगात टिकू शकतो. त्यामुळे चांगले शिक्षण घ्या आणि जीवनात यशस्वी व्हा, असेही त्यांनी मार्गदर्शन यावेळी युवकांना केले.









