महाराष्ट्रानंतर हैदराबादमध्ये सुरक्षेत त्रुटी : टीआरएस नेत्याने अमित शहांच्या ताफ्यासमोर लावली गाडी
हैदराबाद / वृत्तसंस्था
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळून आल्या आहेत. टीआरएस नेत्याने शनिवारी हैदराबादमध्ये त्यांच्या ताफ्यासमोर आपली कार पार्क केली. मात्र, गृहमंत्र्यांच्या सुरक्षा कर्मचाऱयांनी ती तातडीने हटवली. तथापि, या घटनेने पुन्हा एकदा दस्तुरखुद्द देशाच्या गृहमंत्र्यांच्या सुरक्षेत ढिसाळपणा दिसून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत अमित शहा यांच्या सुरक्षेत दिरंगाई होण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी 4-5 सप्टेंबर रोजी त्यांच्या महाराष्ट्र दौऱयावर असताना शहा यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळून आल्या होत्या.
हैदराबाद लिबरेशन डेमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या तेलंगणा दौऱयावर आहेत. याचदरम्यान त्यांच्या सुरक्षेत पुन्हा एकदा ढिसाळपणा दिसून आला. गोसुला श्रीनिवास असे सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न करणाऱया टीआरएस नेत्याचे नाव आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा वाहनताफा हैदराबादमध्ये असताना श्रीनिवास यांची कार अचानक ताफ्यासमोर थांबली. यानंतर गृहमंत्र्यांच्या सुरक्षा कर्मचाऱयांनी कारची तोडफोड केली. गाडी थांबल्यानंतर मी स्वतः तणावात होतो, मात्र अधिकाऱयांनी मागची काच फोडल्याचे श्रीनिवास यांनी सांगितले. याप्रकरणी आपण पोलीस अधिकाऱयांना भेटून तक्रार करणार असल्याचेही ते पुढे म्हणाले.
13 दिवसांत सुरक्षेतील त्रुटीची दुसरी घटना
गेल्या 13 दिवसांत अमित शहा यांच्या सुरक्षेत दिरंगाई होण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी 4-5 सप्टेंबर रोजी मुंबई भेटीदरम्यान एक संशयित काही तास त्यांच्या ताफ्याभोवती फिरत असल्याचे आढळून आले होते. अधिकाऱयांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याला 2-3 तासात अटक केली होती.
हैदराबाद लिबरेशन डेनिमित्त तेलंगणा दौरा
हैदराबाद लिबरेशन डेमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या तेलंगणा दौऱयावर आहेत. पहिल्या दिवशी त्यांनी सिकंदराबाद आर्मी ग्राउंडवर रॅलीला संबोधित केले. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाले, पण हैदराबादमध्ये अजूनही निजामांचे शासन असल्याचे टीआरएसवर निशाणा साधताना शहा म्हणाले.
बॅलिस्टिक शील्ड कव्हरसह झेड प्लस सुरक्षा
2019 मध्ये शहा गृहमंत्री झाल्यानंतर त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. शाह यांना झेड प्लस सुरक्षेसह ब्रीफकेस बॅलिस्टिक शील्डचे कव्हरही देण्यात आले. हे पोर्टेबल बुलेटप्रूफ शील्ड किंवा पोर्टेबल फोल्ड आऊट बॅलिस्टिक शील्ड असून ते हल्ल्यादरम्यान उघडले जाऊ शकते. झेड प्लस सुरक्षेअंतर्गत शहा यांच्या संरक्षणार्थ नेहमीच 24 ते 30 कमांडो सुसज्ज असतात.









