प्राणी पाळण्याचा छंद अनेकांना असतो, हे आपल्याला माहीत आहे. श्वान, मांजर, इतकेच नव्हे, तर काहींना हत्ती, वाघ इत्यादी वन्य आणि सहसा न माणसाळणारे प्राणी पाळण्याचीही आवड असते. वन्य प्राणी पाळण्यावर कायद्यानुसार निर्बंध आहेत. पण विशेष अनुमती घेऊन असे प्राणी पाळले जातात. इथपर्यंत ठीक आहे. पण प्राणी पाळण्याऐवजी स्वत:च प्राणी ‘बनण्या’चा छंद जर कोणाला असेल, तर ती आश्चर्याची बाब मानली जाईल. अलिकडच्या काळात युरोप खंडातल्या अनेक देशांमध्ये असा कल मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. माणसे, विषेशत: युवक-युवती, प्राण्यांसारखी वेषभूषा करुन, अगदी त्यांच्यासारखी शेपटीही आपल्या पाठीशी लावून, त्यांच्यासारखेच चार पायांवर चालताना दिसून येत आहेत. सार्वजनिक स्थानीही अनेकजण अशा प्रकारे ‘प्राणी’ झालेले आढळून येतात.
प्राण्यांसारखे दिसण्याचा आणि चालण्याचा प्रयत्न करणे, हा एकप्रकारचा व्यायामही आहे. त्याला ‘क्वाड्रोबिक्स’ असे म्हणतात. हा संपूर्ण शरिराला व्यायाम देणारा एक प्रकार आहे. यात प्राण्यांप्रमाणे माणूस आपल्या शरीराच्या हालचाली करण्याचा प्रयत्न करतो. प्राण्यांप्रमाणे दोन हात आणि दोन पायांवर चालणे. पळणे आणि इतर हालचाली करणे इत्यादींचा समावेश या व्यायामप्रकारात केला जातो. या व्यायामामुळे शरीराचे वजन झपाट्याने कमी होते. तसेच शरीर पीळदार बनते. तोंडाने प्राण्यांसारखा आवाज काढणे, भुंकणे, एकमेकांवर धावून जाणे, एकमेकांवर ओरडणे, किंचाळणे इत्यादी पशूकृत्येही या व्यायाम प्रकारात केली जातात.
हा कल युरोपात वाढत असता आणि लक्षावधी तरुण-तरुणींना त्याने अक्षरश: वेड लावले असता, व्यायाम तज्ञांनी मात्र, हा छंद जोपासणाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे. प्राण्यांसारख्या हालचाली करणे, हे आपल्यासाठी घातक ठरु शकते, असे या तज्ञांचे म्हणणे आहे. मानवी शरीराच्या हालचाली आणि क्षमता वेगळ्या असतात. त्यामुळे माणसांनी शक्यतोवर प्राण्यांसारख्या हालचाली करण्याचा प्रयत्न करु नये. चतुष्पाद प्राण्यांच्या शरीराची ठेवण आणि माणसाच्या शरीराची ठेवण भिन्न असते. त्यामुळे प्राण्यांसारख्या हालचाली करत असताना आपले हात-पाय आणि इतर अवयवांना इजा होण्याची शक्यता असते. ही इजा स्थायी स्वरुपाचीही असू शकते. त्यामुळे शक्यतो माणसांनी हे करु नयें, असे तज्ञांचे म्हणणे आहे.









