मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आश्वासन : कुंकळ्ळीकरांची 20 वर्षांची मागणी होणार पूर्ण
प्रतिनिधी /पणजी
जगाच्या इतिहासात वसाहतवादाविरोधात झालेले पहिले बंड 349 वर्षांपूर्वी गोव्यात कुंकळ्ळी येथे झाले होते. त्यावरून त्याकाळात कुंकळ्ळीतील लोक किती क्रांतीकारी विचारांचे आणि सर्वधर्मसमभावाने एकजूट बाळगणारे होते याचा प्रत्यय येतो. अशा या क्रांतीविरांनी 15 जुलै 1583 रोजी पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीविरुद्ध केलेल्या बंडाची जागतिक पातळीवर नोंद झाली आहे. हे बंड फारच पूर्वीचे म्हणजे ‘प्रेंच क्रांती’च्याही खूप आधीचे होते. त्यामुळे या बंडाचा इतिहास आता शालेय पाठय़क्रमात समाविष्ट करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली.
कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी शुक्रवारी मांडलेल्या खाजगी सदस्य ठरावावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील घोषणा केली. कुंकळ्ळीतील हुतात्म्यांचे बलिदान भावी पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी हा धडा इतिहासाच्या पाठय़क्रमात यावा, अशी मागणी गेली वीस वर्षे स्थानिक लोक करत होते. त्यांची मागणी आता पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर दरवर्षी 15 जुलै या दिवशी कुंकळ्ळी स्मारकाजवळ 16 महानायकांचे स्मरण करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हे बंड ‘प्रेंच क्रांती’च्याही खूप आधी झाले होते. त्यापूर्वी जगात कुठेच वसाहतवादी राजवटीच्या विरोधात असा उठाव झाला नव्हता. या बंडात युरोपियन जेसुइट पाद्री आणि अन्य धर्मगुरू स्थानिक लोकांचे सक्तीने धर्मांतरण करत होते. त्यामुळे संतापलेल्या कुंकळ्ळीकरांनी एकत्र येऊन त्यांना ठार मारले. मात्र पोर्तुगीजांनी विश्वासघातकी पद्धतीने त्याचा बदला घेतला. तह करण्याच्या बहाण्याने त्यांनी कुंकळ्ळीच्या सरदारांना आमंत्रित केले आणि निःशस्त्र असलेल्या त्या सरदारांवर बेछूट गोळीबार करून मृत्युदंड दिला.
आपल्या पूर्वजांनी पोर्तुगीज राजवटीविरुद्ध कसा लढा दिला याचा इतिहास भावी पिढय़ांपर्यंत पोहोचावा, त्यांनी दाखवलेल्या या धैर्यातून त्यांना प्रेरणा मिळावी तसेच त्या 16 महानायकांचे स्मरण व्हावे या उद्देशाने शालेय पाठय़क्रमात त्याचा समावेश करण्यात येईल, असे सावंत यांनी सांगितले.
इतिहासाच्या पाठय़क्रमात या धडय़ाचा योग्य समावेश करण्याच्या दृष्टीने सरकारने ‘कुंकळ्ळी बंडा’शी संबंधित पोर्तुगीज कागदपत्रांचे भाषांतर सुरू केले आहे, अशी माहितीही पुढे बोलताना डॉ. सावंत यांनी दिली.
ठरावाला पाठिंबा देताना पुरातन व पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी ‘कुंकळ्ळी बंडा’चा इतिहास केवळ पाठय़क्रमातूनच न सांगता हा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी एखाद्या व्यावसायिक चित्रपटाचीही निर्मिती करण्यात यावी, असे मत व्यक्त केले.
आमदार विजय सरदेसाई, उल्हास तुयेकर, एल्टन डिकॉस्टा, दिगंबर कामत, व्हेन्झी व्हिएगश, विरेश बोरकर, आलेक्स लॉरेन्स, संकल्प आमोणकर, चंद्रकांत शेटय़े आदी सदस्यांनीही या चर्चेत विचार मांडताना ठरावास पाठिंबा व्यक्त केला.
शेवटी सर्वांनुमते हा ठराव मान्य करण्यात आला. आता पुढील कार्यवाहीसाठी तो शिक्षण खात्याकडे पाठविण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.









