चिपळूण / गौरव तांबे :
दोन ठिकाणांमधील अंतर दर्शवण्यासाठी शहरातील जुन्या कोयना रस्त्यावर मैलाचा दगड अर्थात ‘माईलस्टोन’ बसवण्यात आला होता. अलिकडे स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूल हा नवा रस्ता करतेवेळी कोयना रस्त्याची साक्ष देणारा हा दगड हटवण्यात आला. नव्या रस्त्यात विशिष्ट काळाची ओळख पुसली गेली असून सध्या हा दगड जलतरण तलाव पररिसरात अडगळीत पडून आहे. हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची मागणी इतिहासप्रेमींमधून होत आहे.
- त्रिकोणाकृती आकाराचे दगड
वाशिष्ठी नदीकिनारी वसलेल्या चिपळूण शहराला सांस्कृतिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. आजही ऐतिहासिक कालखंडाची साक्ष देणाऱ्या पुरातन वस्तू शहरात ठिकठिकाणी आढळतात. त्यापैकी एक असणारा मैलाचा दगड दोन ठिकाणांमधील अंतर दर्शवण्यासाठी रस्त्याच्या एका बाजूला बसवण्यात येत असे. त्या ठिकाणाचे इंग्रजीमध्ये नाव व क्रमांक या दगडावर असल्याने यातूनच त्या रस्त्याचे अंतर समजून येत असे. विशिष्ठ कालखंडाची ओळख सांगणारे त्रिकोणाकृती आकाराचे मैलाचे दगड आजही शहराच्या काही भागात आढळतात.
- ‘चिपळूण-१२’ असे कोरीव काम
पूर्वी वाहतुकीच्यादृष्टीने दाभोळखाडी मार्गे गोळकोट धक्का हे मुख्य केंद्रबिंदू होते ज्यावेळी कोयना जल विद्युत प्रकल्पाच्या बांधकामास सुरुवात झाली त्यावेळी प्रकल्पासाठी असणारी साधनसामुग्री मुंबईतून पुढे दाभोळखाडी मार्गे गोळकोट धक्का येथे येत असे. पुढे ही साधनसामुग्री कोयने येथे नेण्यासाठी गोवळकोट, पेठमाप, मुरादपूर असा जुना कोयना रस्ता तयार करण्यात आला असे असताना आताच्या जलतरण तलावासमोरील भागात त्यावेळी एक मैलाचा दगड बसवण्यात आला होता.
या दगडावर चिपळूण तसेच १२ नंबरवा क्रमांक असून एक अक्षर अस्पष्ट झाले आहे.
- इतर दगडांसह अडगळीत
कालांतराने कोयना प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर जुन्या कोयना रस्त्यावरची वाहतूक बंद झाली. या जुन्या कोयना रस्त्यावर अलिकडे स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूलपर्यंतचा नवा रस्ता करण्यात आला. नवा रस्ता करतेवेळी जुन्या कोयना रस्त्याची साक्ष देणारा मैलाचा दगड हटवण्यात आला. सद्यस्थितीत जुन्या कालखंडाची ओळख सांगणारा हा त्रिकोणाकृती आकाराचा दगड जलतरण तलावाच्या समोरील भागात इतर दगडांसमवेत अडगळीत पडला आहे. या दगडाचा वरील भाग तुटलेला आहे.
- मैलाच्या दगडाची जपणूक व्हावी
अंतर दर्शवणारे मैलाचे दगड अर्थात माईलस्टोन शहरात ठिकठिकाणी आहेत. केवळ हे दगड नाहीत तर ते एका विशिष्ट कालखंडाचे साक्षीदार आहेत. जुन्या ठिकाणांची साक्ष देणारे हे दगड जतन करणे काळाची गरज आहे त्यासाठी सामाजिक संस्थाबरोबरच नगर परिषदेने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा येचील पर्यटन अभ्यासक समीर कोवळे यांनी व्यक्त केली.








