ऐतिहासिक वास्तुकडे महापालिकेचे दूर्लक्ष; डागडुजी करण्याची कळंबा ग्रामस्थांची मागणी
सागर पाटील कळंबा
कळंबा गावासह शहराची तहान भागविणार्या कळंबा तलावातील ऐतिहासिक मनोरा मोडकळीस आला आहे. तलावाचे सुंदर नाक अशी ओळख असणार्या मनोर्याचे झालेली दूरावस्था न पहावणारे आहे. तलावाची मालकी असलेल्या महापालिकेच्या दुर्लक्षामुळेच ही दुर्दशा झाली आहे. मनोर्याच्या छतासह आतील लोखंडी पत्रे गंजले असून ते मोडकळीस आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी येणार्या नागरिकांना गंभीर दुखापती झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. याबाबत ग्रामस्थांमधून तीव्र प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूची महापालिकेकडून तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धऊ लागली आहे.
पिण्यासाठी योग्य असलेल्या हा तलाव म्हणजे एक दुर्मिळ उदाहरणच आहे. कळंबा तलावाला 140 वर्षे पूर्ण झाली आहेत. शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाकडे या तलावाची वाटचाल सुरू आहे. परंतु आता या तलावातील ऐतिहासिक मनोरा मोडकळीस आल्याचे चित्र आहे. तलावातील या मनोऱ्याकडे जाणारा मार्ग खराब झाला आहे. मनोऱ्याचे काही पत्रे उडाले असून काही गंजून तुटले आहेत. बाजूस असणारे लोखंडी संरक्षक कठडे पूर्णपणे तुटले आहेत. त्यामुळे 25 फूट ख•ा आहे. त्याच्यावर टाकलेला पत्राही गंजून अर्धवट तुटला आहे. त्यामुळे दुर्घटना घडण्याआधी याची दुरुस्ती करा, अशी मागणी होत आहे. तलावातील पाणी सायफन पद्धतीने निर्गतीकरण करणाऱ्या मोठ्या जलवाहिन्या या मनोऱ्याच्या खाली आहेत. मनोऱ्यास ठिकठिकाणी गायमुख आहेत. तलावाची पाणीपातळी जसजशी कमी होत जाते तसे गायमुखातून पाणी कळंबा फिल्टर हाऊसकडे जाते.
तलाव परिसर अनेक इमारत बांधकामांच्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर तलाव वाचवण्यासाठी प्रशासनाकडून धडक मोहिमेद्वारे सर्व्हे होणे आवश्यक आहे. गाळ उपसा, पाणीगळती आणि अतिक्रमणे हटवल्यास आणखी जादा पाण्याची उपलब्धता होऊ शकते.
कळंबा तलाव संवर्धनासाठी वेळोवेळी महापालिकेला पत्रव्यवहार केला आहे. तलावाची स्थिती पाहता मनोरा शेवटची घटका मोजत आहे. प्रशासनाने या हेरिटेज वास्तूचे जतन, संवर्धन करणे गरजेचे आहे.
सुमन गुरव, सरपंच, कळंबा
=शहरापासून जवळ कळंबा तलाव आहे. तलावातून आजही शहर व कळंबा गावाला पाणी पुरवठा होतो या शाहूकालीन तलावाचे अस्तित्व राखण्यासाठी डागडुजी करणे आवश्यक आहे. आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे सर्वाना विश्वासात घेऊन पाठपुरावा करणार आहे. महापालिकेने वास्तूचे लवकरात लवकर दुरुस्ती करावी.
सागर भोगम, माजी सरपंच, कळंबा
कळबा तलावासंदर्भात असणारी दुरूस्ती अन् पर्यटन निधीतून राहिलेली कामे महापालिकेने तातडेने पूर्ण करावीत, तलावातील संस्थानकालीन मनोऱ्याची दुरूस्ती करावी. महापालिकेने ग्रामपंचायतीकडे हा तलाव हस्तांतरीत करावा.
अरूण टोपकर, माजी सदस्य, ग्रामपंचायत, कळंबा









