स्माईल ट्रेन उपक्रमांतर्गत जेएनएमसीचा उपक्रम : ओठबाधित मुलांवर मोफत शस्त्रक्रियेबाबत जागृती
बेळगाव : ‘स्माईल ट्रेन’ या एनजीओच्या 25 व्या वार्षिकोत्सवासाठी देशभरातील पुरातत्त्व स्मारके निळ्या रंगाच्या रोषणाईने रंगवली गेली. जगभरातील फाटलेल्या ओठबाधित मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी जागृती म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा भाग म्हणून किल्ला येथील ऐतिहासिक कमल बस्ती निळ्या रंगाच्या रोषणाईने उजळविण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी स्माईल ट्रेनचे ज्येष्ठ उपाध्यक्ष ममता कॅरोल यांनी या उपक्रमाला चालना दिली. बेळगाव येथे कमल बस्ती ऐतिहासिक स्मारक स्फूर्तीदायक आहे. फाटलेल्या ओठबाधित मुलांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी ऐतिहासिक स्मारके उजळवण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या स्मारकांवर पडणारे किरण बाधित मुलांमध्ये विश्वास निर्माण करतात. जेएनएमसीचे उपप्राचार्य व डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळातील स्माईल ट्रेन विभागाचे संचालक डॉ. राजेश पवार म्हणाले, फाटलेल्या ओठबाधितांच्या जागृतीचा हा उपक्रम ऐतिहासिक आहे. प्रकाशाची किरणे प्रत्येकाच्या मनामध्ये विश्वास निर्माण करतात. स्माईल टेनच्या माध्यमातून फाटलेले ओठबाधित मुलांची सातत्याने काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद पसरवला जात आहे.
गेल्या वर्षी सर्वाधिक डिजिटल फोटो पाठवून स्माईल ट्रेनने गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड केले होते. यावर्षीही वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रयत्नाचा भाग म्हणून ऐतिहासिक स्मारके निळ्या रंगाच्या प्रकाशाने उजळवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. फाटलेल्या ओठबाधित मुलांना आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी स्माईल ट्रेनचे सहकार्य मोलाचे आहे, असेही डॉ. राजेश पवार यांनी सांगितले. देशभरात दरवर्षी 35 हजारहून अधिक मुलांचे ओठ जन्मताच फाटलेले असतात. त्यांना बोलताना, खाताना त्रास होतो. श्वास घेतानाही त्रास सहन करावा लागतो. जागृतीअभावी अनेकजण शस्त्रक्रियेपासून वंचित राहतात. कर्नाटकात स्माईल ट्रेन योजनेंतर्गत सात इस्पितळांमध्ये शस्त्रक्रिया केल्या जातात. गेल्या दोन दशकात 45 हजारहून अधिक शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. सन 2000 पासून देशभरातील 125 हून अधिक इस्पितळात साडेसात लाखांहून अधिक मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉ. राजेश पवार यांनी सांगितले. या उपक्रमाबद्दल चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे व कुलगुरु डॉ. नितीन गंगाणे यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.









