स्वातंत्र्य लढ्यादरम्यान होते महत्त्वाचे केंद्र : संबंधित जागेवर उभारले जाणार आलिशान हॉटेल
वृत्तसंस्था/ लंडन
लंडनमधील ऐतिहासिक इंडिया क्लब पुढील महिन्यापासून बंद होणार आहे. इंडिया क्लबमध्ये 1930-40 दरम्यान इंग्रजांच्या राजवटीपासून भारत स्वतंत्र करविण्यासाठी थोर स्वातंत्र्यसैनिक येथे जमत होते. इंडिया क्लबची वास्तू ब्रिटनमधील भारतीय दूतावासानजीकच आहे. इंडिया क्लबमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी अनेकदा अतिथी म्हणून हजेरी लावली होती.

इंडिया क्लबची वास्तू जमीनदोस्त करत तेथे आलिशान हॉटेल उभारले जाणार असल्याचे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सांगितले आहे. इंडिया क्लब जमीनदोस्त करण्यापासून वाचविण्यासाठी अनेक वर्षांपासून मोहीम चालविली जात होती. या मोहिमेत शशी थरूर यांनीही भाग घेतला होता. इंडिया क्लब लोकांसाठी अखेरचे 17 सप्टेंबर रोजी खुले राहणार आहे.
इंडिया लीग ही ब्रिटनमधील संघटना होती, जिने भारताचे स्वातंत्र्य अन् स्वराज्यासाठी अभियान चालविले होते. या संघटनेची स्थापना 1928 मध्ये कृष्ण मेनन यांनी केली होती. या संघटनेच्या बैठका लंडनच्या इंडिया क्लबमध्येच आयोजित व्हायच्या. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर इंडिया क्लबचा वापर भारतीय पत्रकार तसेच बुद्धिवंतांसाठी रेस्टॉरंट आणि विशेष सामुदायिक स्थळ म्हणून करण्यात येत होता. इंडिया क्लब हे भारतीय युवा राजकारण अन् भविष्यासाठीच्या योजनांवर चर्चा करू शकतील अशाप्रकारचे ठिकाण ठरावे असे ब्रिटनमधील भारताचे पहिले राजदूत कृष्ण मेनन यांचे मानणे हेते.
इंडिया क्लब हे घराप्रमाणेच
इंडिया क्लब हे भारतीयांसाठी देशाबाहेरील घरासारखे आहे. स्वातंत्र्यानंतर विविध टप्प्यांमध्ये ब्रिटनमध्ये पोहोचलेल्या भारतीयांना इंडिया क्लबने आपलेपणाची जाणीव करून दिली असल्याचे लंडनमध्ये सेव्ह इंडिया क्लब मोहीम चालविणाऱ्या फिरोजा यांचे सांगणे आहे. केवळ भारतीयच नव्हे तर अन्य खंडांमधून आलेल्या लोकांचेही येथे स्वागत करण्यात आले. याचमुळे इंडिया क्लबचे अस्तित्व वाचविण्यासाठी 9 हजार लोकांनी याचिकेवर स्वाक्षरी केली आहे. या लोकांमध्ये भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अॅनी बेझंट अन् माउंटबॅटन यांचे वंशज देखील सामील आहेत.









