वाहनांच्या लांबच लांब रांगा : प्रवाशांत नाराजी
बेळगाव : बेळगाव-संकेश्वर मार्गावरील सुतगट्टी घाटानजीक शनिवारी तब्बल एक तास वाहतूक कोंडी झाली होती. राष्ट्रीय महामार्गावर सहापदरी रस्त्याचे काम सुरू असताना एक क्रेन उलटल्याने महामार्ग ठप्प झाला. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. तब्बल एक तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. बेळगाव-संकेश्वर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण केले जात आहे. सुतगट्टी घाटातील चढाव कमी करण्यासाठी ब्रिजचे बांधकाम केले जात आहे. यामुळे रस्त्याच्या एकाच बाजूने वाहनांची ये-जा सुरू आहे. गणेशोत्सवासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने मुंबई, पुणे येथील शेकडो नागरिक बेळगावच्या दिशेने येत आहेत. यामुळे शुक्रवारी रात्रीपासूनच महामार्गावर वाहनांची वर्दळ आहे. त्यातच शनिवारी सकाळी क्रेन कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने तब्बल तासभर वाहने रस्त्यावर अडकून पडली. महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाल्याने सर्व्हिस रोडवरूनही वाहनांची ये-जा सुरू झाली. काही नागरिकांनी महामार्ग पोलिसांशी संपर्क साधून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, बेळगावला येणाऱ्या गणेशभक्तांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागला.









