पंतप्रधानांची राहणार उपस्थिती : उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी धडपड
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले असून या हायटेक रेल्वेस्थानकाचे उद्घाटन जानेवारी 2023 मध्ये होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बेळगावमध्ये येणार असल्याने त्यावेळी त्यांच्याच हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकात उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू आहे.
ब्रिटिशकालीन बेळगावच्या रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले. कै. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या उपस्थितीत 28 फेब्रुवारी 2019 मध्ये नूतनीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. मार्च 2021 पर्यंत काम पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु मध्यंतरी असणारे लॉकडाऊन व त्यानंतर गावी परतलेले कामगार यामुळे काम पूर्ण होण्यास विलंब झाला. देशातील एक हायटेक रेल्वेस्थानक म्हणून बेळगावची ओळख निर्माण होणार आहे.
कोरोनापूर्वी दररोज 13 ते 14 हजार प्रवासी बेळगाव रेल्वेस्थानकातून प्रवास करीत होते. प्रवाशांच्या मानाने इमारत व इतर सुविधा अपुऱ्या पडत होत्या. त्यामुळे 3 मजली भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. याचबरोबर सरकते जीने, प्लॅटफार्म क्रमांक 1 ते 4 चे नूतनीकरण करण्यात आले आहे. नव्या रेल्वेस्थानकात भव्य प्रवेशद्वार असून आतमध्ये प्रवाशांसाठी मोठी जागा उपलब्ध आहे.

रेल्वेस्थानकाला दुसऱ्या बाजूने प्रवेशद्वार
बेळगाव रेल्वेस्थानकाला गुड्सशेडरोड येथूनही नवे प्रवेशद्वार निर्माण करण्यात आले आहे. यामुळे शहराच्या दक्षिण भागात राहणाऱ्या नागरिकांना रेल्वेस्थानकात पोहोचणे सोयिचे होणार आहे. त्याचबरोबर रेल्वे डब्यांची दुरुस्ती बेळगावमध्येच व्हावी यासाठी भव्य कोचिंग डेपो उभारण्यात आला आहे. मिरज नंतर हुबळी येथे रेल्वेत पाणी भरण्याची सोय होती त्यामुळे बेळगावमधून निघणाऱ्या एक्स्प्रेस मिरज अथवा हुबळी येथे थांबवाव्या लागत होत्या. परंतु आता बेळगावमध्येच पीटलाईन तयार करण्यात आली असून यामुळे रेल्वेत पाणी भरणे व स्वच्छता करणे हे सोयिचे ठरणार आहे.
रेल्वेस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
रेल्वेस्थानकाचे काम पूर्ण झाले असून रेल्वेस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. कै. सुरेश अंगडी यांच्या संकल्पानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते उद्घाटन केले जाणार असल्याने विलंब होत होता. पंतप्रधानांच्या तारखा उपलब्ध होत नसल्याने रेल्वेस्थानकाचे उद्घाटन रखडले होते. परंतु अखेर जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पंतप्रधान बेळगावमध्ये येणार असल्याने त्यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.









