सैन्याच्या निवृत्त अधिकाऱ्यावर दाखविला विश्वास
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमधील हिंसा अद्याप पूर्णपणे थांबलेली नाही, आता राज्यातील तणावाचे वातावरण दूर करण्यासाठी सैन्याच्या एका निवृत्त अधिकाऱ्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या सैन्याधिकाऱ्याने 2015 मध्ये म्यानमारमध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. मणिपूर सरकारने कर्नल (निवृत्त) नेक्टार संजेनबम यांना मणिपूर पोलीस विभागात सीनियर सुपरिंटेडेट म्हणून तैनात केले असून त्यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असणार आहे.
संजेनबम यांना कीर्ति चक्र आणि शौर्य चक्रने गौरविण्यात आले होते. संजेनबम यांनी सैन्याधिकारी म्हणून काम केले असल्याने त्यांना ही विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. मणिपूरमध्ये मागील 3 महिन्यांमध्ये हिंसा सुरू असून आतापर्यंत 170 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर हजारो लोकांना स्थलांतर करावे लागले आहे.









