कॉलेजला जाताना ट्रकची दुचाकीला धडक : एक महिला जखमी
बेळगाव : भरधाव ट्रकने दुचाकीला ठोकरल्याने जुन्या भाजी मार्केटजवळील खिमजीभाई पेट्रोल पंपजवळ सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात विद्यार्थिनी जागीच ठार झाली. दुचाकीला धडक बसल्यानंतर विद्यार्थिनी ट्रकखाली चिरडली गेली तर एक महिला जखमी झाली. वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. अवजड वाहनांना सकाळी शहरात बंदी घालण्याची मागणी जुनीच आहे. पोलीस दलाने या मागणीकडे पाठ फिरविल्याने अपघातांची संख्या वाढती आहे.
सादीया शब्बीरअहम्मद पाळेगार (वय 16) असे अपघातात जागीच ठार झालेल्या दुर्दैवी विद्यार्थिनीचे नाव आहे. ती भरतेश कॉलेजमध्ये पियुसी पहिल्या वर्षात शिकत होती. सादीया मुळची कुडची (ता. रायबाग) येथील राहणारी होती. शिक्षणासाठी अशोकनगर येथील आपल्या मामाची घरी राहत होती.
या अपघातात सादीयाची मामी नेहा तौसीफ काजी (वय 26, रा. अशोकनगर) याही किरकोळ जखमी झाल्या आहेत. सोमवारी सकाळी 7.20 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. सादीयाची मामी आपल्या दुचाकीवरुन तिला कॉलेजला सोडण्यासाठी जात होती. त्यावेळी ट्रकची दुचाकीला धडक बसली. ट्रकची धडक बसल्यानंतर नेहा एका बाजूला फेकल्या गेल्या तर सादीया ट्रकखाली चिरडली गेली. वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी, उपनिरीक्षक शोभा कंबी व त्याच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणीनंतर सादीयाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. विद्यार्थिनीच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.









