पुणे / प्रतिनिधी :
मराठवाडा, विदर्भ तसेच दक्षिण कोकण व गोव्याच्या भागातील कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील बहुतांश भागात 5 ते 7 मार्चदरम्यान तुरळक पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला.
मार्च महिन्यास सुरुवात झाली असून, उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली आहे. पंजाब, हरियाणा राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या भागात सरासरी तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. महाराष्ट्रातही आता उन्हाचा चटका वाढला आहे. सरासरी तापमानात 2 ते 5 अंश सेल्सिअसने वाढ झाल्याने उष्मा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यातही मराठवाडा, विदर्भ, दक्षिण कोकण व गोव्याच्या भागात कमाल तापमान वाढले आहे. या भागात कमाल तापमान 36 ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे. दुसरीकडे उत्तर -दक्षिण असा ट्रफ पसरल्याने दक्षिणपूर्व राजस्थान, दक्षिण मध्य प्रदेश, गुजरात तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या महाराष्ट्राच्या भागात शनिवार 4 मार्चपासून ते 7 मार्चपर्यंत तुरळक पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
अधिक वाचा : अखेर पिंपरी-चिंचवड शास्तीकर मुक्त; एक लाख मिळकतधारकांना दिलासा
दोन दिवस कमाल तापमान कायम
दरम्यान, पुढील दोन दिवस कमाल तापमान राज्यात कायम राहणार आहे. त्यानंतर त्यात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यात पावसाचा अंदाज
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस तुरळक पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
कर्नाटक किनारपट्टी, केरळात उष्णतेची लाट
कर्नाटक किनारपट्टी तसेच केरळात उष्णतेची लाट असून, ही लाट दोन दिवस कायम राहणार आहे. यादरम्यान 36 ते 39 अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गुरुवारी मंगळूरमध्ये देशातील सर्वाधित 39.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.








