चित्ते पुनर्वसन मोहीम सुरूच राहणार
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये 9 चित्त्यांच्या मृत्यूचे प्रकरण सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आले. यावेळी दरवषी 12 ते 14 नवीन चित्ते आणले जातील. काही समस्या आहेत, परंतु काळजी करण्यासारखे काहीही नसल्याचे केंद्र सरकारच्यावतीने न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने केंद्राचा युक्तिवाद ग्राह्य धरून सुनावणी बंद केली आहे. भारतामध्ये चित्ते पुन्हा आणण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत यावर सरकारला प्रश्न विचारण्याचे कारण नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये गेल्या वर्षभरात नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून वीस प्रौढ चित्ते आणण्यात आले होते. कुनोमध्ये चार पिल्ले जन्माला आली. मात्र, त्यापैकी तीन पिल्लांसह नऊ चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. जगाच्या इतर भागांच्या तुलनेत भारतात चित्त्यांच्या मृत्यूची संख्या खूपच कमी आहे. ही प्रक्रिया यापुढेही सुरू राहणार असून वातावरणातील बदलामुळे जन्म आणि मृत्यूच्या घटना यापुढेही घडू शकतात, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. 1952 मध्ये देशातून चित्ता नामशेष झाल्यानंतर विशेष प्रकल्पांतर्गत भारतात पुन्हा चित्त्यांचे पुनर्वसन करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे.









